‘निमा’त प्रशासक नेमण्याचा धर्मादाय आयुक्तांचा निर्णय; दोन्ही गटांचा विजयाचा दावा

सातपूर (नाशिक) :  नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) वर धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाला आता पूर्णविराम मिळणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही गटांनी विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे. 

सहधर्मादाय आयुक्त जयसिंग झपाटे यांनी ही नियुक्ती केली. आता ‘निमा’चा कारभार धर्मादाय उपायुक्त राम लिपटे, धर्मादाय निरीक्षक पंडितराव झाडे व ॲड. देवेंद्र शिरोडे (धुळे) बघणार आहेत. ‘निमा’च्या निवडणुकीवरून हा वाद थेट न्यायालय व त्यानंतर धर्मादाय आयुक्त कार्यालयात पोचला होता. त्यानंतर अगोदर दिलेल्या निकालातच प्रशासक बसवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता ही नियुक्ती झाली असून, ‘निमा’च्या संघर्ष करणाऱ्या दोन्ही गटांना हा धक्का बसला आहे. 

‘निमा’सारख्या मोठ्या संस्थेची गेली पन्नास वर्षांची शासकीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली होती. दोन वर्षांत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या बेकायदेशीर कारभारामुळे ही वेळ आली आहे. 
- धनंजय बेळे, माजी अध्यक्ष, निमा 

न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य, बेकायदेशीर कारभार करून संस्थेचा ताबा घेणाऱ्यांना बाहेर काढले, हाच खरा विजय. 
- मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष, निमा 

निकाल मान्य असून, पन्नास वर्षांचे लेखापरीक्षण तसेच चेंज रिपोर्ट समीट न केल्याने ते महत्त्वाचे काम आम्ही आमच्या काळात पूर्ण केले. सुमारे सातशे नवीन सभासदही केले. पण विरोधकांना भविष्यात ‘निमा’त येण्याचे स्वप्न धूसर दिसत असल्याने न्यायालयात जाऊन ‘निमा’ची पत लयाला लावली. 
- शशिकांत जाधव, माजी अध्यक्ष, निमा 

विश्‍वस्त मंडळाने ‘आयमा’प्रमाणे ‘निमा’बाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेतला असता, तर आज ही वेळ आली नसती. न्यायालयाचा निर्णय मान्य असून, हाच आमचा विजय आहे. 
- तुषार चव्हाण, माजी सरचिटणीस