राजीवनगर हळहळले! जवानाचा ‘तो’ व्हिडीओ कॉल ठरला अखेरचाच; घटनेने मातेसह पत्नीचा आक्रोश

राजीवनगर (नाशिक) :  एक डिसेंबर पर्यंत नितीन घरी येणार होते, त्या संबंधित कालच सायंकाळी  (ता 28)  व्हिडिओ कॉल वर कुटुंबातील सदस्यांसोबत त्यांची चर्चा देखील झाली होती. एवढेच नाही तर सुट्टीहून परत जाताना ते पत्नी, मुलगी आणि आईला देखील आपल्या सोबत नेणार होते. मात्र आज पहाटे रायपूर येथील रुग्णालयातून दूरध्वनी आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं  झालं..

घटनेवर विश्वासच बसेना

येथील सुकमा ताडमेटलामध्ये माओवाद्यांनी IED स्फोट घडवला   आणि या हल्ल्यात रायपूर येथे  नितीन भालेराव माओवादी हल्ल्यात शहीद झाले, बंधू अमोल यांनाआज पहाटे रायपूर येथील रुग्णालयातून दूरध्वनीवर ही दुःखद घटना कळविण्यात आली. तेव्हा  प्रथमतः या दुःखद घटनेवर त्यांचा विश्वासच बसला नाही. मात्र दूरचित्रवाणीवर सुरू झालेल्या बातम्या द्वारे त्यांना या दुःखद घटनेवर विश्वास ठेवावा लागला. त्यांनंतर संपूर्ण कुटुंब कोसळलेल्या मानसिकतेमध्ये होते. जवळच असलेल्या चेतना नगर मध्ये राहणारे त्यांचे सासरे जयवंत कुलकर्णी आणि परिवार देखील शोक मग्न झाला. गावी असणारे काका सुरेश भालेराव आणि कुटुंबीय यांचा देखील या घटनेवर विश्वास बसत नव्हता.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

एकट्या आईकडून भावंडाचा सांभाळ

अवघ्या दीड वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाल्यानंतर आईंनी या सर्व भावांना वाढवले होते. त्यांना आई भारती, पत्नी रश्मी, पाच वर्षाची मुलगी वेदांगी, प्रेस मध्ये नोकरीला असलेला मोठा भाऊ अमोल, गुरुगोविंद सिंग महाविद्यालयात प्राध्यापक असलेला लहाना भाऊ सुयोग, वहिनी वृषाली आणि पुतणी ग्रीष्मा असा परिवार आहे. अनिल भालेराव यांचे वास्तव्य असलेल्या राजीवनगर येथील श्रीजी सृष्टी इमारतीमधील रहिवासी आणि आसपासच्या भागावर शोककळा पसरली आहे.

असा होता त्यांचा सैन्य दलातातील प्रवास

नितीनचे शालेय शिक्षण सिन्नर येथील सारडा विद्यालयात झाले. त्यानंतर नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. 2008 ला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या उपनिरीक्षक पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी यश मिळवले आणि माउंट आबू ला प्रशिक्षणासाठी रवाना झाले. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा किताब त्यांनी तेथे मिळवला. त्यामुळे त्यांची अत्यंत संवेदनशील कारवाई करणाऱ्या कोब्रा 206 बटालियन साठी निवड करण्यात आली आणि कर्नाटकला पुढील ट्रेनिंग साठी पाठवण्यात आले. तेथे देखील ते सर्वोत्कृष्ट कॅडेट ठरले. त्यामुळे त्यांची या बटालियनमध्ये अंतिम निवड करण्यात आली. भंडारा हे मुख्यालय असले तरी छत्तीसगड आदी भागातील नक्षली कारवाया रोखण्याची मुख्य जबाबदारी या बटालियन कडे होती. तत्पुर्वी त्यांनी पीएम हाऊसला देखील काम केले होते. केंद्रीय राखीव दलाची परीक्षा पास होण्यासोबतच ते सैन्यातील लेफ्टनन पदाची परीक्षा देखील पास झाले होते. मात्र मुलाखतीसाठी तिकडे सुरू असलेल्या प्रशिक्षणातून परवानगी न मिळाल्याने त्यांनी हेच पद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

 मित्रांनी जागवल्या आठवणी

महाविद्यालयीन काळातच एनसीसी ची सी सर्टीफिकीट परीक्षा नितीन यांनी पास केली होती. त्यावेळचे त्यांचे मित्र राहुल गिरी, अभिषेक कुलकर्णी आदींनी त्यांच्या फ्लाईंग क्लब आणि तोपखाना केंद्रात येणाऱ्या विविध पाहुण्यांना स्वागतासाठी पायलट म्हणून काम केल्याच्या आठवणी जागवल्या. अगदी शालेय जीवनापासूनच जायचे तर संरक्षण दलातच जायचे यावर ते ठाम होते. ट्रान्सपोर्ट पायलट पदासाठी देखील त्यांची निवड झाली होती मात्र संपूर्ण निवड प्रक्रिया ते पूर्ण करू शकले नाहीत.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

 शहीद नितीन भालेराव चौक 

लॉकडाउन दरम्यान ते घरी आले असताना जूनमध्ये कामावर हजर होण्यासाठी ते गेले होते. मात्र काळाने असा घाला घातल्याने हे कुटुंब दुःखात बुडाले होते. खासदार हेमंत गोडसे, सभागृहनेता सतीश सोनवणे, नगरसेवक ऍड शाम बडोदे, अमोल जाधव, देवानंद बिरारी, आदींनी भालेराव कुटुंबीयांचे सांत्वन केले. येथील चौकाचे शहीद नितीन भालेराव चौक असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.