“काम मिळाले नाही तर अन्नछत्रच आधार”; भिक्षेवर उपजीविका करणाऱ्या कष्टकऱ्यांची व्यथा

पंचवटी (जि.नाशिक) : कोरोनामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. त्यातच बांधकाम क्षेत्रात अद्यापही हवी तशी संधी उपलब्ध होत नसल्याने गंगाघाटावर वास्तव्यास असणाऱ्या कष्टकऱ्यांचे कोणी काम देते का काम, अशी हाकाटी सुरू असते. मात्र ज्यांना प्रयत्न करूनही काम मिळत नाही त्यांना मात्र, नाइलाजाने पोटाची भूक भागविण्यासाठी गाडगे महाराज पुलाखाली दानशूरांचे दातृत्व आणि अन्नदानासाठी रांगेत उभे राहावे लागते. 

गंगाघाटावर भिकाऱ्यांच्या रांगेत काम नसलेले कष्टकरी 
गंगाघाटावरील रोकडोबा मंदिराच्या समोरच्या जागेत दिवसरात्र अनेक कष्टकऱ्यांचा राबता असतो. ज्यांना कामगारांची गरज आहे, असे अनेक जण वाहने घेऊन या ठिकाणी येतात. या ठिकाणी स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होत असल्याने सकाळच्या सुमारास मजूर बाजारही बहरू लागला आहे. मात्र ज्यांना काम मिळत नाही, असे अनेक जण दिवसभर या ठिकाणी मिळणाऱ्या भिक्षेवर उपजीविका करतात. यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठी गर्दी उसळते. खाद्यपदार्थ घेऊन एखादे वाहन आले की हे लोक लगेच त्याभोवती गर्दी करतात. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

बांधकाम व्यवसायातही आवश्‍यक तेवढी तेजी नाही
कोरोनामुळे अद्यापही अनेक व्यवसाय ठप्पच आहे. बांधकाम व्यवसायातही आवश्‍यक तेवढी तेजी नाही, त्यामुळे कष्टक-यांचे जगणे अवघड बनले आहे. त्यांच्यासाठी गंगाघाटावर नियमित अन्नदान करणारेच या वर्गाचा आधार बनले आहेत. तसेच वर्षातील बाराही महिने अन्नछत्र सुरू असलेली गाडगे महाराज धर्मशाळा व रामकुंडावरील साईभंडारा या लोकांसाठी खऱ्या अर्थाने अन्नछत्र बनले आहे. या दोन्ही ठिकाणी अंध, अपंग व गरिबांना गरमागरम अन्नपदार्थ दिले जातात. 

हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न