काय सांगता! सोमवारी मिळणार ‘उल्कावर्षाव’ची अनुभूती? खगोलप्रेमींसाठी पर्वणी

नाशिक : खगोलप्रेमींना वर्षातील सर्वांत प्रलंबित मिथुन राशीतून होणारा जेमिनिड उल्‍कावर्षाव (मिटीओर शॉवर) अनुभवता येणार आहे. रविवारी (ता. १३) मध्यरात्री अर्थात सोमवारी (ता. १४) रात्री दोन ते पहाटे पाच या वेळेत उल्‍कापात शिखरांवर असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक सुदर्शन गुप्ता यांनी दिली. उल्‍कांचे प्रमाण ताशी १२० ते १५० इतके राहणार असल्‍याचा ‘नासा’तर्फे अंदाज व्‍यक्‍त केला असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले. 

उल्कावर्षाव ही निसर्गाची विलोभनीय देणगी
 गुप्ता म्‍हणाले, की उल्कावर्षाव ही निसर्गाची विलोभनीय देणगी आहे. प्राचीन काळी लोकांना उल्कावर्षावाची भीती वाटायची. विज्ञान प्रगत होण्यासोबत ही भीती कमी झालेली आहे. उल्कावर्षाव हा धूमकेतूमुळे दिसतो. जेव्हा धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करून जातो, तेव्हा तो आपल्या मागे वायू आणि धूळ सोडतो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना या धुळीच्या मार्गातून जाते. तेव्हा ही धूळ (खडक, धातू, वायू, बर्फ आदी) पृथ्वीच्या गुरुत्वामुळे आकर्षित होऊन जमिनीकडे खेचले जाते. या उल्का सरासरी ताशी ५० हजार किलोमीटरच्या गतीने वातावरणातून प्रवेश करतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर हे खडक घर्षणामुळे जळायला सुरवात होते आणि सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते.

खगोलप्रेमींना दोन तासांच्‍या कालावधीपर्यंत अनुभवता येणार ​

बहुतेक उल्का आकाशात जळून जातात. मात्र, मिथुन (जेमिनिड) राशीतील उल्कावर्षावाचा स्रोत ३२०० फेथन नावाचा लघुग्रह आहे. दर वर्षी या लघुग्रहाचे कण ४ ते १७ डिसेंबर या काळात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. १३-१४ डिसेंबरच्या रात्री त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. लघुग्रहाचे कण धूमकेतूच्या शेपटीतील धूलिकणांपेक्षा आकाराने मोठे असल्यामुळे या उल्का अधिक तेजस्वी दिसतात. म्हणूनच मिथुन राशीतील (जेमिनिड) उल्का वर्षावातील भरवशाच्या मानल्या जातात. 

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

खगोलप्रेमींसाठी आणि हौशी नवीन दर्शकांसाठी चांगली संधी
रविवारी (ता. १३) मध्यरात्री मिथुन राशीत पुनर्वसू नक्षत्रात होणारा हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी निरीक्षण करता येईल. ताशी सुमारे १००-१५० उल्का पडताना दिसतील. अनेक वेळा चंद्रप्रकाशाचा अडथळा असल्यामुळे उल्का दिसण्याचे प्रमाण खूपच कमी असते. परंतु या वेळी कार्तिकी अमावस्या असल्याने चंद्रप्रकाशाचा अडथळा नसेल. म्हणून ही खगोलप्रेमींसाठी आणि हौशी नवीन दर्शकांसाठी चांगली संधी आहे. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण

असा पाहता येईल उल्‍कावर्षाव 
उभे राहून उल्का पाहणे कठीण असून, पाठीवर लोळून किंवा आरामखुर्चीवरून पाहणे सोयीचे आहे. त्यामुळे आपली नजर जास्त आकाश पाहू शकते. उल्का पाहण्यास दुर्बीण वापरता येत नाही. द्विनेत्री (बाइनाक्युलर) सोयीचे नाही. उल्का निरीक्षण केवळ साध्या डोळ्यांनी सोयीचे आहे. कृत्रिम प्रकाश नसलेल्‍या शहराच्या दूरच्‍या ठिकाणी जाऊन निरीक्षण केलेले उत्तम आहे. शहरातून उल्का निरीक्षण करण्यासाठी उंच इमारती उपयुक्‍त ठरतात. मध्यरात्री पूर्व दिशेला हा उल्कावर्षाव पाहता येईल. त्यानंतर मिथुन राशीचा पश्चिमेकडे प्रवासाला सुरवात करेल. सोमवारी (ता. १४) पहाटे उल्कावर्षाव पश्चिमेकडे दिसेल. मध्यरात्रीनंतर उल्कांची संख्या वाढते, अशीही माहिती त्यांनी दिली.