”थांबा…संगणक नादुरुस्त आहे!” कर भरणासाठीच्या रांगेत नागरिक हैराण

सातपूर (नाशिक) : ऑनलाइनचा डंका वाजविला जाणाऱ्या नाशिक महापालिकेच्या सातपूर येथील विभागीय कार्यालयात कर, पाणीपट्टी कर संकलन केंद्राचे संगणक सतत नादुरुस्त होत असल्याने तासनतास रांगेत उभे राहून नागरिकांना संगणक दुरुस्त होण्याची वाट पाहावी लागते. 

भरणा केंद्राची यंत्रणाही कोलमडली

महापालिकेच्या मुख्यालयासह शहरातील सहा विभागांतील घरपट्टी, पाणीपट्टी यांसह विविध करांचे भरणा केंद्र हे खासगी बॅंकेला दिले आहे. मात्र संबंधित खासगी बँकेची रिझर्व्ह बॅंकेकडून चौकशी सुरू झाल्यापासून संबंधित बॅंकेची काय अडचण झाली माहिती नाही, पण शहरात महापालिकेच्या कामकाजाची मात्र मोठीच बोंबाबोंब सुरू आहे. महापालिकेच्या भरणा केंद्राची यंत्रणाही कोलमडली. आता कुठे रिझर्व्ह बॅंकेने काही नियम शिथिल केल्यानंतर कामकाज सुरू झाले; पण नादुरुस्त संगणकाची डोकेदुखी वाढली आहे. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

नागरिकांना मनस्ताप

सातपूर कार्यालयात सध्या रोजच संगणक नादुरुस्तीचा विषय डोकेदुखी ठरतो आहे. नागरिक कर भरणा करण्यासाठी कार्यालयात येतात. त्यासाठी रांगेत नंबरही लावतात; पण मध्येच संगणक नादुरुस्त तर इंटरनेटची समस्या उद्‍भवल्याचे सांगून तासनतास नागरिकांना रांगेत ताटकळत उभे ठेवले जाते. ज्यांना उभे राहावत नाही ते बिचारे भरणा न करताच निघून जातात. 
त्यामुळे नादुरुस्तीमुळे ही यंत्रणा कागदावरच आहे. त्यामुळे निदान इंटरनेटची कायमस्वरूपी सोय करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

सातपूर कार्यालयातील अडचणींबाबत महापौर व इतर पदाधिकाऱ्यांना सांगितले; पण काहीच उपयोग झाला नाही. आता महापालिका आयुक्त किंवा आमदारांनी तरी लक्ष घालावे. 
-गोविंद शहाणे, त्रस्त नागरिक