‘समृद्धी’च्या ब्लास्टिंगमुळे धामणीत घरांना तडे; धोकादायक जिलेटिन बेवारस स्थितीत 

इगतपुरी (जि.नाशिक) : इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रस्त्यासाठी खडक फोडण्यासाठी कंपनीकडून ब्लास्टिंगचा वापर केला जात आहे. प्रमाणापेक्षा मोठ्या ब्लास्टिंगमुळे धामणी गावातील नागरिकांच्या घराला सोमवारी (ता. १४) तडे गेल्याच्या तक्रारी आहेत. 

धोकादायक जिलेटिन बेवारस स्थितीत, पंचनाम्याची मागणी 

ब्लास्टिंगनंतर फुटणारे दगड उडून थेट घरावर पडत असल्याने घराची कौले व पत्रे फुटतात. शेतातील शेतमालावरही दगड व माती पडत असल्याने शेतमालाचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. समृद्धी महामार्गात जमीन गेल्यामुळे आधीच या भागातील अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. अनेकांनी जमिनीच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून येथील शेतकऱ्यांनी नवीन घरे बांधली आहेत. आता या महामार्गाच्या कामामुळे रस्त्यांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत. घरांच्या नुकसानीनंतर धामणी येथील सरपंच गौतम भोसले यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी (ता. १५) तहसीलदार परमेश्वर कासुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांनी धामणी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. 

घरांचे नुकसान 
धामणी भागातील राजाराम भोसले, संदीप भोसले, पंढरीनाथ भोसले, रामचंद्र भोसले, परशुराम भोसले, किरण काळे, गणेश काळे, शिवाजी भोसले, केशव भोसले आदींच्या नवीन घरांना तडे गेल्याने नवीन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विठोबा भोसले, राजाराम भोसले, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, गणेश भोसले, कारभारी भोसले, विष्णू भोसले, रामदास भोसले, वसंत भोसले, गोपाळा भोसले, भाऊसाहेब भोसले, आंतु भोसले आदी शेतकऱ्यांच्या शेतातील टोमॅटो व काकडी पिकांवर दगड व माती पडल्याने शेतमालाचे प्रचंड नुकसान झाल्याच्या तक्रारीनंतर धामणीतील ग्रामस्थांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे तक्रार केली. ॲड. कोकाटे यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना भ्रमणध्वनी करून नुकसान झालेल्या घरांची व शेतमालाचे पंचनामे करून भरपाई देण्याच्या सूचना दिल्या. 

हेही वाचा>> अवघ्या पंचक्रोशीचे काळीज हेलावले! जेव्हा लष्करी अधिकारी 'तिरंगा' वीरपत्नी धारित्रींना सुपूर्द करतात तेव्हा...
बेवारस जिलेटिन 
धामणी परिसरात ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारा जिलेटिनचा साठा बेवारस पडून आहे. त्याविषयी स्थानिक नागरिकांनी तक्रारी मांडल्या. सुरक्षारक्षक नसल्याने मोठ्या जीवितहानीची शक्यता येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा