चिंताच सोडा! आता टपाल खात्यात घरबसल्या पैसे भरता येणार; ‘ही’ सुविधा उपलब्ध

नाशिक : कधीकाळी केवळ टपालाची देवाणघेवाण करणा-या टपाल खात्याने आता खरोखर कात टाकली आहे. खात्याच्या पीपीएफसह रिकरिंग, सुकन्या समृद्धी योजनेत पैसे भरण्यासाठी आता टपाल कार्यालयात जाण्याची आवश्‍यकता नाही. विभागातर्फे आता ‘आयपीपीबी’त (इंडियन पोस्ट पेमेन्‍ट बँक) खाते खोला अन घरूनच पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टपाल बँकेत कोरोना काळात तब्बल ३८ हजार खाती

नवीन खातेदारांनी एप्रिलपासून आजपर्यंत नाशिक विभागात तब्बल ३८ हजार टपाल बँकेत खाती उघडत खात्याच्या बँकींगलाही मोठा प्रतिसाद दिला आहे. यासाठी कोणत्याही टपाल कार्यालयात अवघे शंभर रूपये भरून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्‍यकता नसून केवळ आधारनंबर, मोबाईल क्रमांकासह जवळच्या टपाल कार्यालयात भेट देऊन हे खाते उघडता येते. विशेष म्हणजे अन्य बँकांसारखीच टपाल बँकेतही संबंधित ग्राहक आपल्या खात्यातील शिल्लक फोनद्वारे माहिती करून घेऊ शकतात.

टपाल बँकेद्वारे मिळणा-या सुविधा

१) रिकरिंग डिपॉझिटसह पीपीएफ व अन्य पैसे भरण्याची सुविधा.
२) आरटीजीएस, एनईएफटी, युपीआयद्वारे पैसे ट्रान्सफरची सुविधा.
३) सर्व प्रकारची बिले, एलआयसी प्रिमियम घरूनच भरता येणार.
४) यात अकांऊंट नंबर लक्षात ठेवण्याची चिंता नाही.
५) मोफत त्रैमासिक अकाऊंट स्टेटमेंट उपलब्ध.
6) हाताळण्यास सहज, सोपे अन सुलभ.