”…अन्यथा मी स्वत: आंदोलन करणार!” भर सभागृहात खासदार भामरेंचा सज्जड दम

सटाणा (नाशिक) : पंचवीस वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित असलेल्या बागलाण तालुक्यातील सिंचन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामे रखडली आहेत. ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिला. येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

तर मी स्वतः आंदोलन करणार

डॉ. भामरे म्हणाले, की तालुक्यातील हरणबारी उजवा व डावा कालवा, केळझर डावा कालवा, केळझर चारी क्र. ८, केळझर वाढीव चारी क्र.८, तळवाडे भामेर पोचकालवा, सुळे डावा कालवा व अप्पर पुनंद या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी युती शासनाच्या कार्यकाळात पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यता व संबंधित एजनसीकडे निधी वर्ग केला. काही प्रकल्पाच्या कामात स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध व इतर तांत्रिक अडचणी होत्या. त्या चर्चेतून सोडविण्यात दीड वर्ष लागले. नंतर कोरोनामुळे आठ-दहा महिने वाया गेली. मात्र आता प्रत्येक खातेप्रमुखाने नियोजनाप्रमाणे कामे केल्यास मार्चअखेर सर्व कामे पूर्ण होऊ शकतील, जर नियोजनानुसार असे न झाल्याने मी स्वतः आंदोलन करणार असल्याचा सज्जड दमही डॉ. भामरे यांनी संबंधित खातेप्रमुखांना दिला. 

हेही वाचा >  दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

सिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही प्रकल्पामुळे मार्गी 

बैठकीत खासदारांनी सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच अप्पर पुनंद हादेखील तालुक्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, कळवण तालुक्यातील पुनंद नदीचे पाणी बागलाणमधील ३५-४० खेड्यांना पिण्यासाठी मिळणार असून, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही या प्रकल्पामुळे मार्गी निघणार आहे. प्रकल्पासाठी तीन वर्षांपासून आपण स्वतः पाठपुरावा करत अप्पर पुनंदसाठी शासनाकडून पाणी आरक्षित करून घेण्याबरोबर प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला आहे. डॉ. शेषराव पाटील, तालुकाध्यक्ष संजय देवरे, प्रदीप कांकरिया, अशोक गुंजाळ, सुधाकर पाटील, तापी महामंडळ, स्थानिक स्तर, गोदावरी महामंडळ विभागाचे अधिकारी, शेतकरी, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.  

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार