अमेरिकन राजदूताचा गोदाघाटावर ‘हेरिटेज वॉक’! सुस्पष्ट संस्कृत मंत्रोच्चाराने पुरोहित मंडळीही अवाक 

म्हसरूळ (नाशिक) : अमेरिकेचे राजदूत डेव्हिड रान्झ  हे नाशिक दौऱ्यावर आले असून, त्यांनी पत्नीसमवेत रविवारी (ता. १५) शहरात ‘हेरिटेज वॉक’ करत नाशिककरांना दीवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गोदाघाटावर फेरफटका मारत गोदावरीचे दर्शन घेतले. रामकुंडावर पूजा-अभिषेक केला. विशेष म्हणजे, या वेळी संकल्प सोडताना त्यांनी संस्कृतमध्ये अत्यंत सुस्पष्टपणे केलेला मंत्रोच्चार ऐकून पुरोहितांसह स्थानिक उपस्थित सर्वच जण अवाक झाले. 

अमेरिकन राजदूताचा गोदाघाटावर हेरिटेज वॉक 
डेव्हिड रान्झ   हे पत्नीसह नाशिकमध्ये आले आहेत. त्यांनी रविवारी (ता.१५) शहरातील प्रसिद्ध पांडवलेणीसह पंचवटीतील श्री काळाराम मंदिर, नारोशंकर मंदिर, गंगा गोदावरी मंदिर व गोदाघाटावर फेरफटका मारला. काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदास पुजारी यांनी या दांपत्याला मंदिरांचा सुमारे सात हजार वर्षांचा   इतिहास, पंचवटीत प्रभू श्रीरामचंद्र  यांचा  चौदा वर्षांचा वनवास काळ,  सिंहस्थ  कुंभमेळा माहिती   व महती याबद्दल इंग्रजीमध्ये माहिती दिली. ही सगळी माहिती ऐकून हे दांपत्य खूप प्रभावित झाले. नाशिकची महती ऐकून ‘आम्हाला विश्वासच बसत नसल्याचे गौरवोद्‍गार त्यांनी काढले. आता आम्ही नाशिकच्या प्रेमात पडलो असून, पुन्हा नाशिकला आवर्जून येणार असल्याचेही या वेळी ते म्हणाले. गंगा गोदावरी मंदिरात त्यांनी सपत्नीक पूजा व अभिषेक केला. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

सुस्पष्ट संस्कृत मंत्रोच्चाराने पुरोहित मंडळीही अवाक 

या वेळी त्यांनी अत्यंत स्पष्ट व शुद्ध संस्कृतमध्ये संकल्प सोडत मंत्रोच्चार केला. या वेळी आश्चर्यचकित झालेल्या उपस्थितांपैकी काहींनी त्यांना संस्कृतबद्दल विचारले असता, मी संस्कृतचा अभ्यास करत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पुरोहित संघाच्या वतीने रान्झ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या दांपत्याने उपस्थितांसमवेत सेल्फीही घेतले. याप्रसंगी त्यांच्यासोबत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात होती. या वेळी पुरोहित  संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पंडित अतुल शास्त्री गायधनी  उपस्थित होते.  

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात