कांद्यापाठोपाठ मक्यालाही ‘अच्छे दिन’! लासलगावहून प्रथमच रेल्वेने तेराशे टन मका रवाना

लासलगाव (नाशिक) : लासलगाव नगरीतून प्रथमच देश-विदेशात निर्यातीसाठी शेतकऱ्यांचे पिवळे सोने समजला जाणारा तेराशे टन मका २१ रेल्वे वॅगनमधून शनिवारी (ता.२८) रवाना झाला. लासलगाव येथून शिवशक्ती ट्रेडर्ससाठी हा मका रेल्वेने मुंबईकडे पाठवला आहे.

कांद्यापाठोपाठ मक्यालाही चांगले दिवस

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मका खरेदीदार व्यापारी सचिनकुमार ब्रह्मेचा यांनी खरेदी केलेल्या मक्‍याला निर्यातीसाठी पहिल्यांदाच रेल्वेमार्गाने पाठवले जात आहे. गेल्या वर्षी रेल्वेद्वारे ४४ वॅगनमधून २४ हजार ९०० टन मका पाठविला होता. कांद्याच्या माहेरघरातून कांद्यापाठोपाठ मक्यालाही चांगले दिवस आल्याने शेतकऱ्यांच्या मालाला दोन पैसे मिळत आहेत. यंदा पावसाने कांदा पिकाला मोठा फटका दिल्याने बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र मक्यातून बळीराजाला आर्थिक मदत मिळत आहे.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

मक्याला आज चांगला भाव मिळत आहे. पावसाने मका ६० टक्के खराब झाला असून, ४० टक्के माल चांगला आहे. त्याला आज एक हजार ३७५ ते एक हजार ५०० रुपये भाव मिळत आहे. तर सरकारची खरेदी एक हजार ८३० रुपये होत आहे. चांगला माल व खराब माल यांच्यामध्ये फक्त दीडशे रुपयाचा फरक आहे. शेतकरी कांदा लागणीसाठी व्यस्त असताना मका विक्रीस आणण्यास विलंब होत आहे. - सचिनकुमार ब्रह्मेचा (मका निर्यातदार, लासलगाव)

लासलगाव रेल्वेस्थानकावरून प्रथमच निर्यातक्षम मका पाठविला जात आहे. या माध्यमातून रेल्वेला सुमारे पाच लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. - नीलेश उपाध्ये (रेल्वे कार्टिंग एजंट, लासलगाव)

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार