बायोगॅस संयंत्र उभारण्यास पोल्ट्रीधारकांची पसंती; ‘असे’ होताहेत फायदे

देवळा (नाशिक) : मृत कोंबडी पक्ष्यांची विल्हेवाटाची सोय व त्यातून मिळणारे गॅसरूपी इंधन, यामुळे येथील अनेक पोल्ट्रीधारक बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देत आहेत. प्रदूषणास आळा बसत असल्याने लॉन्सधारकही आता बायोगॅस संयंत्र बसवू लागले आहेत.

शेतीसाठी उत्कृष्ट प्रकारची स्लरी व खत

नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत बायोगॅस संयंत्र उभारणी केली जाते. विशेष म्हणजे त्याला १७ हजार रुपये अनुदान आहे. शौचालय जोडणी केल्यास आणखी एक हजार ६०० रुपये जास्तीचे अनुदान आहे. १२ बाय १० फूट एवढ्या जागेवर आरसीसी रचनेत हा प्लांट बांधला जातो. यात गायी-गुरांच्या शेण-मलमूत्रासह इतर ओले खत, उष्टे-शिळे अन्न, पोल्ट्रीफार्मवरील मृत पक्षी असे सारे यात टाकून गॅसरूपी इंधन मिळवता येते. विशेष म्हणजे यापासून फळबागेसाठी व इतर शेतीसाठी उत्कृष्ट प्रकारची स्लरी व खत मिळते. जे पिकांना तत्काळ लागू होते.

शिवाय आर्थिक बचतही

कसमादे पट्ट्यात कुक्कुटपालन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोंबडी पक्षी मोठे करत असताना काही पक्षी रोगास बळी पडतात. त्यांची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान या व्यावसायिकांपुढे असते. खड्डा खोदून पुरणे हाच एक पर्याय असला तरी, काहीवेळा ते इतस्ततः फेकले जातात. यामुळे वातावरणात प्रदूषण होते. यावर पर्याय म्हणून पोल्ट्रीधारकांनी बायोगॅसला पसंती दिली आहे. यामुळे मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावणे सोपे तर झालेच आहे, शिवाय गॅस इंधन मिळू लागल्याने आर्थिक बचत होऊ लागली आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

दरम्यान, या भागातील मंगलकार्यालय, लॉन्सवाल्यांनीही बायोगॅस संयंत्रास पसंती दर्शवत बांधकामे करून घेतली आहेत. लग्नसमारंभ वा इतर कार्यक्रमाप्रसंगी उरलेले उष्टे व शिळे अन्नपदार्थ यांची यात विल्हेवाट सहज लावता येते. काही मोठे शेळीपालन करणारे तसेच, मटन शॉपवालेही बायोगॅस बांधून घेऊ लागले आहेत. कारण त्यांच्याकडेही असे बरेच ओले खत व इतर विघटन होण्याजोगे घटक असतात. त्याचा निचरा यातून होऊ शकतो. कोणताही वास नाही किंवा इतर काही त्रास नसल्याने बायोगॅसला पसंती मिळत आहे.

असे मिळते अनुदान

नाशिक जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात १४० बायोगॅस संयंत्र उभारण्यात आले. २०१९-२० मध्ये २५२, तर २०२०-२१ मध्ये २६५ पेक्षा जास्त बायोगॅस प्लांट उभी राहणार आहेत. केंद्रशासनाकडून १२ हजार रुपये (अनुसूचित जाती- जमातीसाठी १३ हजार) व जिल्हा परिषद सेस अंतर्गत पाच हजार रुपये अनुदान मिळते. त्यासाठी सात-बारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, अर्ज यांची पूर्तता करणे आवश्यक असते.
 
कुक्कुटपालन व्यवसाय करताना मृत पक्ष्यांची विल्हेवाट कशी करायची, असा प्रश्‍न असायचा. परंतु, आता या बायोगॅस संयंत्रामुळे तो सुटला आहे. शिवाय गॅसरुपी इंधन मिळत असल्याने आर्थिक बचत होत आहे. - भरत चव्हाण, मेशी, ता. देवळा

लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमात नाही म्हटले तरी थोडेफार उष्टे व शिळे अन्न टाकावेच लागते. इतरत्र टाकले तर प्रदूषण होते. त्यापेक्षा बायोगॅसच्या माध्यमातून एक चांगला पर्याय मिळाला आहे. - गुंजाळ अप्पा, संचालक तुळजाई लॉन्स