महत्वाची कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची कटकट नकोय? मग जाणून घ्या शासनाच्या ‘ई-लॉकर’ सुविधेबद्दल

नाशिक :  महत्वाची कागदपत्रे सारखी सोबत घेऊन फिरण्याची ही कटकट नको हवी असेल तुमच्यासाठी राज्य सरकारने एक भारी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ती म्हणजे राज्य सरकारने ‘ई-लॉकर’ नावाचा एक उपयुक्त पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. जाणून घ्या नेमकी काय आहे ही सुविधा....

ई-लॉकर’ म्हणजे नेमके काय रे भाऊ?
ई-लॉकर’ सुविधा ही आधारकार्डशी संलग्न करण्यात आली आहे. आपल्या आधारकार्ड क्रमांकाचा वापर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.आधार कार्डाशी संलग्न असलेली 'ई-लॉकर' ही सुविधा महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. राज्य सरकारने `महा ई-लॉकर’ ही सुविधा पूर्णपणे मोफत सुरू केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून जन्माचा दाखला, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्रे `ई लॉकर’मध्ये अपलोड करता येतात. आपल्याला हवी ती कागदपत्रे आपण अपलोड करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता `सॉफ्ट कॉपी’ आपल्या लॉकरमध्ये अपलोड केली जाईल. मात्र, या `ई-लॉकर’साठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे.

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

ई-लॉकरचा फायदा काय?
नोकरीसाठीच्या मुलाखती, बँकेसंबंधी कामे किंवा अन्य कारणांसाठी आपली महत्त्वाची कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत घेऊन फिरावे लागते.  कधी कधी तर एखादे महत्त्वाचे कागदपत्र ऐनवेळी घरीच विसरण्याचीही नामुष्की ओढवते. यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ई-लॉकरमुळे कधीही, कुठेही आपली महत्त्वाची कागदपत्रे हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, आपल्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागदपत्रे डाऊनलोड करता येतील. 

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

ही सुविधा कशी वापरावी?
elocker.maharashtra.govt.in या संकेतस्थळाला भेट द्या. इथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून `साइन अप’ करा.

यानंतर तुम्ही आधार कार्डवेळी जो मोबाइल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक `वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) येईल. तो पासवर्ड अर्ध्या तासापर्यंत वापरता येईल, अन्यथा परत लॉगिन करावे लागेल. हा पासवर्ड टाकून `व्हॅलिडेट ओटीपी’ वर क्लिक करा.

या प्रक्रियेनंतर तुम्हाला 6 अंकी पिन तयार करावा लागतो. हा पिन कायमस्वरुपी असतो.

तुम्ही तयार केलेला पिन टाकून `व्हॅलिडेट पिन’वर क्लिक करा. तुमचा `महा डिजिटल लॉकर’ तयार होईल.

आता तुमच्या `महा डिजिटल लॉकर’वर तुम्ही तुमची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करू शकता. त्यासाठी `अपलोड डॉक्युमेंटस्’वर क्लिक करा. त्यात विविध कागदपत्रांचे पर्याय आहेत. ही डॉक्युमेंटस् केवळ पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी, बीएमपी किंवा जीआयएफ या फॉरमॅटमधीलच असावी लागतात.