नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हालचाली ; शिवबंधन बांधलेल्या माजी ‘आमदारां”ना पक्षात पुन्हा आणणार? राजकीय वर्तुळात चर्चा

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी राज्यातील आगामी निवडणुका एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे एकटा पडलेला पक्ष भाजपने देखील महाविकास आघाडीविरुद्ध कंबर कसली आहे. शिवसेनेत जाऊन मनगटावर शिवबंधन बांधलेले माजी आमदार यांना पुन्हा पक्षात बोलवण्यासाठी भाजपनं गळ टाकला आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवबंधन बांधलेल्या माजी आमदारांना पक्षात पुन्हा आणणार? राजकीय वर्तुळात चर्चा

 शिवसेनेत जाऊन मनगटावर शिवबंधन बांधलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पुन्हा पक्षात बोलवण्यासाठी भाजपाने गळ टाकला आहे. मात्र, भाजपच्या गळाला बाळासाहेब सानप पुन्हा लागतात का, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, जयसिंगराव गायकवाड यांच्या सारख्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली आहे. आता बाळासाहेब सानप भाजपची साथ देतात का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर ठरले होते. 2014 मध्ये नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर सानप यांना विजय मिळाला होता. माजी आमदार बाळासाहेब सानप हे 2014 मध्ये नाशिक-पूर्व मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांनी भाजपनं 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही.

एका महिन्याच्या कालावधीत तीन पक्षांचा प्रवास

नंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊ केली होती. त्यामुळे सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांना पराभव सामना करावा लागला. सानप यांनी पराभवानंतर राष्ट्रवादीलाही रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. बाळासाहेब सानप यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतलं होतं. विशेष म्हणजे बाळासाहेब सानप यांनी एका महिन्याच्या कालावधीत तीन पक्षांचा प्रवास केला होता.