‘सुरेश घुगे..अमर रहे..!’ अस्तगावच्या वीरपुत्राला शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

मनमाड (नाशिक) :  जम्मू च्या राजोरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या सीमावर्ती भागात गस्त घालत असताना जवान सुरेश रघुनाथ घुगे यांना वीरमरण आले. त्यांच्यावर आज (ता.१४) दुपारी शोकाकुल वातावरणात नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘सुरेश घुगे ..अमर रहे ... अमर रहे !’ च्या घोषणा आणि साश्रुनयनांनी या वीरपुत्राला जवानांनी अखेरची मानवंदना दिली. यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला होता. वीरपुत्राला अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न झाले होते.

जवान सुरेश घुगे हे 24 मराठा बटालियन मध्ये कार्यरत होते,  त्यांची नियुक्ती जम्मूच्या नौसेरा या सीमावर्ती नियंत्रण रेषेवर होती. या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना ते उंच डोंगरावरून खाली पडले त्यात डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले.

सारा गाव शोकसागरात बुडाला

आपण पडलो व जखमी झाल्याचा फोनही त्यांनी आपल्या पत्नीला केला. त्यानंतर कुटूंबीय काळजीत पडले मात्र या दरम्यान उपचार सुरु असतांना ते शहीद झाल्याचे वृत्त कळविण्यात आले. ता 12 रोजी सकाळी हे कळताच अस्तगाव पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी वीर जवान सुरेश घुगे यांच्या निवासस्थानी धाव घेतली . पत्नी, आईवडील व नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांना हलवून गेला.  2006 मध्ये ते लष्करात दाखल झाले सोळा वर्षांपासून लष्कराच्या सेवेत होते सेवापूर्तीला अवघे काही वर्षे शिल्लक असतांना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, नऊ वर्षाची मुलगी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे गावचा सुपुत्र वीरमरण आल्याचे वृत्त गावात समजल्यावर सारा गाव शोकसागरात बुडाला. गावचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. ग्रामस्थांनी जागोजागी अभिवादनाचे फलक लावत श्रद्धांजली वाहिली.

‘अमर रहे... अमर रहे... सुरेश घुगे अमर रहे...’

वीर जवान सुरेश घुगे यांचे पार्थिव आज दुपारी जम्मूवरून पुणे व तेथून अस्तगाव येथे आणण्यात आले. वीर जवान सुरेश यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय आणि लोकप्रतिनिधी, प्रशासन उपस्थित होते. यानंतर सुरेश यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी नागरिकांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. नंतर फुलांनी सजवलेल्या विशेष वाहनांमधून त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कार स्थळी नेण्यासाठी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘ अमर रहे... अमर रहे... सुरेश घुगे अमर रहे...’ अशा घोषणा देण्यात आल्या. सर्वांच्या हातात तिरंगी ध्वज होते अंत्ययात्रेत लहान थोरांसह  तालुक्यातील नागरिक आबालवृद्ध सहभागी झाले होते. अंत्ययात्रा गावाजवळील शेतातील पटांगणात आल्यानंतर लष्करातर्फे जवानाला मानवंदना देण्यात आली. सुभेदार संदीप कुंभार यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. लष्करातर्फे सुरेश यांच्या आई, वडील, तसेच पत्नीचे सांत्वन करण्यात आले.

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न

शहीद सुरेश यांच्या पार्थिवाला लपेटलेला तिरंगी ध्वज काढून लष्करी अधिकाऱ्यांनी तो विरपत्नी धारित्री यांना सुपूर्त करताच उपस्थितांचे काळीज हेलावून गेले यावेळी जवानाला मानवंदना देण्यात आली. त्यांची मुलगी आराध्या हिने आपले विरपिता जवान सुरेश यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. यावेळी अनेकांच्या अश्रुना बांध फुटला होता. अखेरचा निरोप देताना वातावरण सुन्न झाले होते.

यावेळी आमदार सुहास कांदे यांच्यासह पोलीस अधिकारी, माजी सैनिक, लष्करी अधिकारी, महसूल व इतर शासकीय अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार सुहास कांदे, खासदार डॉ भारती पवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, काँग्रेसचे अशोक व्यवहारे, पोलीस उपअधीक्षक समरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार उदय कुलकर्णी उपस्थित होते

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी या घुगे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून एक कोटी जाहीर करतो तसेच शासनाकडून इतर ज्या सवलती आहे त्या कुटुंबियांना मिळून देण्यात मदत करेल शहीद सुरेश घुगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 
- सुहास कांदे, आमदार, नांदगाव