Site icon

Aditya Thackeray : ३४ वर्षाच्या युवकाला पाडण्यासाठी सगळे गद्दार एकत्र येतात

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा

सध्याच्या विश्वासघातकी सरकारवरून जनतेचा विश्वास उडाला आहे. शेतीव्यवसाय कोलमडला आहे. उद्योग क्षेत्रात निराशा आहे. युवक बेरोजगार झाला आहे. फक्त खोटी आश्वासने देण्यापलीकडे ठोस काही करत नाही. अस्थिर असणाऱ्या या सरकारमुळे महाराष्ट्र राज्य अधोगतीला गेले आहे. निवडणुकांमध्ये हीच जनता त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी चांदोरी (ता. निफाड) येथे केले.

निफाडला तालुका शिवसेना व युवा सेना आयोजित शेतकरी व युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार अनिल कदम, आ. नरेंद्र दराडे, कुणाल दराडे, उपनेते सुनील बागूल, युवा सेना समन्वयक नीलेश गवळी, समीर बोडके, तालुकाप्रमुख सुधीर कराड आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी बैलगाडीमध्ये युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व अनिल कदम यांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत

यावेळी पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी जनतेशी संवाद करत महाराष्ट्र फिरतोय. लोकांशी बोलताना लक्षात येतं की, जे कट्टर शिवसैनिक आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. तसेच जनतेचा महाविकास आघाडीकडे कल वाढतोय. गद्दार फुटले तेव्हा गुजरातला गेले. त्याचीच परतफेड म्हणून या गद्दारांनी गुजरातला उद्योग भेट दिले.

ठाकरे पुढे म्हणाले की, माझा वरळीतील विजय आजच निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वरळीत लक्ष देतात. सभा घेतात, यावरून त्यांचा पराभव त्यांना स्पष्ट दिसतो आहे. माझ्यासारख्या ३४ वर्षाच्या युवकाला पाडण्यासाठी संपूर्ण गद्दार एकत्र येतात. यावरून त्यांना पराभव दिसत आहे.

सध्याचे सरकार आंधळे, बहिरे मुके

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सध्याचे सरकार आंधळे, बहिरे आणि मुके आहे. निर्यात शुल्कवाढीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीची मदत मिळत नाही. येणाऱ्या काळात जनताच सरकारला वठणीवर आणेल, असा घणाघात त्यांनी केला. माजी आमदार अनिल कदम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना सडकून टीका करत निफाड मतदारसंघातही शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या असून, जिल्हा बँकेच्या ओटीएस योजना व द्राक्ष उत्पादकांच्या समस्येबाबत ठाकरे यांचे लक्ष वेधले.

यावेळी उपसरपंच मोनिका टर्ले, शहाजी राजोळे, राजेश पाटील, शरद कुटे, आशपाक शेख, खंडू बोडके-पाटील, भाऊसाहेब कमानकर यांच्यासह निफाड तालुक्यातील शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते.

The post Aditya Thackeray : ३४ वर्षाच्या युवकाला पाडण्यासाठी सगळे गद्दार एकत्र येतात appeared first on पुढारी.

Exit mobile version