Aditya Thackeray : ज्यांना मिठी मारली, त्यांनीच पाठीवर वार केले

आदित्य ठाकरे

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी प्रचार केला, राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा देत मंत्री केलं, त्यांनीच संकटाच्या काळात अन्नावर शपथ घेऊन नंतर पाठीत खंजीर खुपसला. या गद्दारांची काय अवस्था झालीयं, मुख्यमंत्री कोण तेच कळत नाही. तरी या 40 गद्दारांचे अनैतिक सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, अशा शब्दांत युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

शिवसंवाद अभियानांतर्गत ठाकरे यांनी शनिवारी (दि.20) मालेगावला भेट दिली. दत्तचौकात सायंकाळी साडेसहा वाजता नियोजित सभेला ठाकरे साधारण तीन तास उशिराने पोहोचले. स्वागत, सत्काराला फाटा देत त्यांनी थेट माईक हाती घेत सत्तांतर नाट्यावरील रोष व्यक्त केला. मात्र, त्यांनी बंडखोर आमदार-खासदारांचा नामोल्लेख टाळला. एकनाथ शिंदे यांचा तात्पुरते मुख्यमंत्री असा उल्लेख केला. एक सीएम आणि एक सुपर सीएम आहे. मुख्यमंत्र्यांनी जन्माष्टमतीला आम्ही 50 थरांची हंडी फोडल्याचे सांगितले. पण ते 50 थर नव्हे तर 50 खोकी होती. हंडी तर फोडली पण मलई एकट्यानेच खाल्ली, अशी कोटी करीत त्यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

ज्यांना मिठी मारली, ज्यांच्या प्रचारासाठी रोड शो केला, त्यांनीच पाठीवर वार केले. त्यांचे आता काय झाले ते तुम्ही बघताय, असे म्हणत ठाकरे यांनी येथील आताच्या आमदारांना आपण कोणतं खातं दिलं होतं असा सवाल केला. सभेतून कृषी असे प्रतिउत्तर आले. त्यांना आता कोणतं खातं मिळालंय, मला पण नाही आठवत, अशी कोटी करीत मंत्री दादा भुसे यांचा नामोल्लेख टाळत नाराजी व्यक्त केली. ज्यांनी उद्धव साहेब आजारी असताना अन्नाची शपथ घेऊन दुसर्‍याच दिवशी पक्ष सोडला. ते तुमचे काय होणार. त्यांच्यासह सर्व 40 जणांना आता गद्दारीचा शिक्का घेऊन फिरावे लागेल. राज्यातील जनता गद्दारी खपवून घेणार नाही. त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. आम्ही जनतेचा कौल मान्य करू. मध्यावर्धी निवडणुका लागतील, त्यामुळे राज्यात फिरतोय, सर्वत्र प्रेम मिळतेय. आशीर्वाद असू द्या, मला सांभाळून घ्याल ना, अशी साद घालत त्यांनी आपले भाषण आटोपते घेतले.

याप्रसंगी आमदार नरेंद्र दराडे, नेते आदेश बांदेकर, जिल्हा नेते जयंत दिंडे, अल्ताफ शेख, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, महानगरप्रमुख राजाराम जाधव, कैलास तिसगे, हाजी मो. यासिन, भरत पाटील, प्रेम माळी, अजय जगताप, दत्तू गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

..होऊन जाऊ द्या निवडणुका
स्वतःला क्रांतिकारी बोलताहेत, उठाव केल्याचे सांगत आहेत. बंड, क्रांती करायला हिंमत लागते. हे डरपोक लोक होते, त्यांनी गद्दारी केली. हा शिक्का त्यांच्या माथ्यावर असेल. होऊन जाऊ द्या या 40 जागांवर निवडणुका, जनतेचा कौल आम्हाला मान्य असेल, असे खुले आव्हान युवा सेनेचे नेते ठाकरे यांनी व्यासपीठावरून दिले. शिवाय, राजकारण खालावल्याचीही खंत व्यक्त केली.

हेही वाचा :

The post Aditya Thackeray : ज्यांना मिठी मारली, त्यांनीच पाठीवर वार केले appeared first on पुढारी.