Site icon

Amruta Fadnavis : आपण एकत्र आहोत, हीच महाशक्ती

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
ब्राह्मण महासंघ संस्था अनेकांसाठी झटते आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा आकांक्षा समजून घेत आहेत. ‘हम सब एक है’ आणि आपण एकत्र आहोत हीच महाशक्ती आहे. याच एकजुटीने आपल्याला परिवर्तन करता येईल, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.

औरंगाबाद नाका येथील स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे सोमवारी (दि.14) अखिल भारतीय सर्व शाखीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघ आयोजित दीपावली स्नेहमिलन मेळाव्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपल्या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य होतील, असे आश्वासनही दिले.

अध्यक्षस्थानी गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, अखिल भारतीय बहुभाषिक ब—ाह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, अखिल ब—ाह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, महंत भक्तिचरणदास महाराज, अनिकेतशास्त्री देशपांडे, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, भगवान पाठक यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, प्रभू श्रीराम यांचे नाशिकमध्ये चरण लागले. या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे. पंचवटीत गेल्या बारा वर्षांपासून इमारतीचे बांधकाम सुरू करणे रखडले आहे. त्या कामाची जबाबदारी भारती पवार यांच्यासह स्थानिक आमदार यांच्यावर सोपवते. नेशन फर्स्ट हे आपले ब्रीद असल्याने, शुक्ल यजुर्वेद संस्थेची इमारत उभी करण्यासाठी कोण मध्ये येतो ते मी बघते. जे अधिकारी हे काम थांबवत आहेत त्यांची नावे मला कळवा मी पुढे बघते. मला कोणताही पुरस्कार नको असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर श्री गणेश वंदना सादर करण्यात आली. यानंतर भालचंद्र शौचे, शांताराम शास्त्री भानोसे, दिनेश शास्त्री गायधनी, कैलास मठातील विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्राचे पठण केले. खण, शहाळे, पैठणी देऊन ओटी भरण करण्यात आले. यावेळी सन्मानचिन्ह देऊन, पगडी घालून अमृता फडवणीस, समाजातील उद्योजक व प्रमुख व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. जय परशुराम, जय जय परशुराम अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. भानुदास शौचे यांनी प्रास्ताविक, तर अलका चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले. भगवंत पाठक यांनी आभार मानले. वृषाली घोलप यांनी पत्राद्वारे ब—ाह्मण समाजाची व्यथा मांडली. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

हेही वाचा :

The post Amruta Fadnavis : आपण एकत्र आहोत, हीच महाशक्ती appeared first on पुढारी.

Exit mobile version