Bhandara hospital fire news : घटनेची चौकशी करून सरकार दोषींवर कारवाई करणार – भुजबळ

नाशिक : भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुःखद;

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दुर्दैवाने मृत्यू झालेल्या लहान मुलांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नये. यासाठी सरकार प्रयत्न करेल असे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची कारणे काय आहेत हे तपासण्याची गरज आहे. अनेक रूग्णालये, नर्सिंग होम यांची फायर ऑडिट करण्याची गरज आहे. अनेक रूग्णालयामध्ये वायरिंग वर्षोनुवर्षे बदलली नाही, त्यावरच रुग्णालयातल्या विविध मशीन चालत असतात. त्यामुळे ती बदलण्याची गरज असल्याचे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

दुर्दैवाने आपण १० बालकांना वाचवू शकलो नाही

या दुर्घटनेत त्या हॉस्पिटल मधल्या परिचारीका आणि काही कर्मचाऱ्यांनी ७ बालकांना वाचवले आहे. त्या कर्मचाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजे पण दुर्दैवाने आपण १० बालकांना वाचवू शकलो नाही. त्या बालकांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असल्याच्या भावना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच