Site icon

Bogus doctor : साक्री तालुक्यातील ८६ बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरात तब्बल २९० बोगस डॉक्टरांची यादी प्रशासनाकडे असून देखील गेल्या आठ महिन्यात फक्त पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

बोगस डॉक्टर अनेकांच्या जीवाशी खेळताहेत सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने हे रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. मात्र जिल्ह्यात अनेक जण वैद्यकीय शिक्षण न घेता प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. हे बोगस डॉक्टर अपूर्ण माहितीच्या आधारावर रुग्णांना औषधे देत असल्याने यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा देखील सामना करावा लागला आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरीय पुनर्विलोकन समिती स्थापन करण्यात आले आहे. या समितीकडे जिल्ह्यातील २९० बोगस डॉक्टरांची यादी असून आत्तापर्यंत फक्त पाच जणांवर कारवाई झाली असल्याचे कळते.

धुळे जिल्ह्यात २९० बोगस डॉक्टरांची संख्या असून यातील सर्वाधिक संख्या ही साक्री तालुक्यात ८६ इतकी आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस निरीक्षकांकडे पाठवली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली
जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी त्यांची यादी जाहीर करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र अद्यापही ही यादी प्रसिद्ध झाली नसून बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

हेही वाचा :

The post Bogus doctor : साक्री तालुक्यातील ८६ बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी? appeared first on पुढारी.

Exit mobile version