BREAKING : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलणार; लवकरच होणार अधिकृत घोषणा

नाशिक :  साहित्यिक आणि वाचकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निश्चित वेळेत होण्याची चिन्हे आता काही दिसत नाहीत. कारण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 94 वे साहित्य संमेलन पुढे ढकलणार असल्याचा निर्णय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे हे संमेलन घेणे कितपत सुरक्षित आहे याबाबत बैठक पार पडल्याचे समजते. 

कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाइन पद्धतीने घ्यावे, असा सूर साहित्यिक आणि नाशिककरांकडून येऊ लागला होता. बाहेरून येणाऱ्यांकडून कोरोनाचा फैलाव होऊ शकतो याची शक्यताही नाकारता येत नव्हती. राज्यात सध्या मुंबई, पुणे, ठाणे आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेण्याचे ठरविले आहे. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

छगन भुजबळही कोरोनाग्रस्त

संमेलनाच्या स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना आठवडाभरापूर्वीच कोरोना झाल्याने ते उपचार घेत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत संमेलनासंदर्भात घोषणा होणार नाही. त्यामुळे नाशिकमध्ये होणारे संमेलन आता पुढे ढकलणार असल्याची चर्चा सुरू आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष हजर नसतानाच संमेलनाचे समन्वयक समीर भुजबळदेखील कामात फारसे लक्ष घालताना दिसत नाहीत. त्यामुळे हे संमेलन पुढे ढकलले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समजत आहे.

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा