Chandrakant Patil : पॉलिटेक्निकचे शिक्षण आता मराठीत

chandrakant_patil www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नव्या शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निकचे शिक्षण मराठीत उपलब्ध होईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ३१ डिसेंबरपर्यंत पॉलिटेक्निकची सर्व पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी एक डिव्हाइसही तयार केले जाणार आहे. जेणेकरून एखाद्या शिक्षकाने इंग्रजीमधून अध्यापन केले, तर विद्यार्थ्याला डिव्हाइसच्या माध्यमातून तत्काळ मराठीत ऐकावयास मिळावे व विषय समजायला सोपा व्हावा, असेही ना. चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे लघुउद्योग भारतीतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल. त्यानुसार पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम मराठीतून केला जाणार असून, ३१ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मराठीत पुस्तके उपलब्ध करून दिले जातील. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या घोषणेनंतर पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे पुस्तके मराठीत उपलब्ध होणार आहेत.

नो कमेण्ट्स : नोटाबंदीच्या निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर ना. पाटील यांना विचारले असता, त्यांनी यावर टिपणी करणे टाळले. तसेच अनिल परब यांचे रिसोर्ट पाडण्यासाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना १०० कोटी रुपये दिल्याच्या किरीट सोमय्या यांच्या टि्वटबाबतही त्यांनी बोलणे टाळले. तर संजय राऊत यांनी आईसाठी लिहिलेल्या पत्रावर बोलताना ते म्हणाले की, ‘या देशात प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा हक्क आहे. त्यामुळे आईकडे भावना व्यक्त करणे स्वाभाविक आहे.

अंधेरी निवडणुकीतून भाजप बाहेर? 

अंधेरी पूर्वची निवडणूक भाजप लढविणार काय? याबाबत बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमच्याकडे अतिशय सुंदर लोकशाही रुजली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व निवडणुकीत भाजप उमेदवार देणार काय? याबाबतचा प्रस्ताव आमच्या महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डच्या माध्यमातून केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठविला जाईल. त्यानंतरच उमेदवाराबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच ऋतुजा लटके यांचा राजीनामा लटकविला काय याबाबत विचारले असता, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनानेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून त्यांनी मविआवर निशाणा साधला. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली तर दीड-दीड महिना कलाकारांना पोलिस स्टेशन फिरविल्याचे त्यांनी सांगितले.

आमच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण :

मराठा क्रांती मोर्चा फोडण्याचा आरोप केल्यावरून विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘मी जर मराठा मोर्चा फोडण्याचा प्रयत्न केला असता तर त्या-त्यावेळी ते समोर आले असता. ज्या क्लिपवरून हा आरोप केला जात आहे, त्याची विश्वासार्हता काय? समाजाला माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला वर्षानुवर्षे न मिळणारे आरक्षण मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही ते एक वर्षे टिकले. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण करायची गरजच नाही. जे ओबीसीला तेच मराठा समाजाला दिले. अनेकांना नोकऱ्या दिल्या. महाविकासाच्या आघाडीच्या अकतृर्त्वामुळे जे आरक्षण गेले, ते पुन्हा मिळविण्याचा आमचा प्रयत्न असेल. आरक्षण मिळेपर्यंत ज्या सुविधा देणे अपेक्षित आहे, त्याची घोषणाही येत्या आठवडाभरात केली जाईल.

हेही वाचा:

The post Chandrakant Patil : पॉलिटेक्निकचे शिक्षण आता मराठीत appeared first on पुढारी.