Chhagan Bhujbal : फुले दाम्पत्याचे तैलचित्र मंत्रालयात; निर्णयाबद्दल भुजबळांकडून आभार

छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.

मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिवेशन काळात केली होती. याबाबत शासनाने मंगळवारी (दि.6) मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भुजबळांनी दिलेल्या पत्रात म्हटले होते की, मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर दर्शनी भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ या महापुरुषांचे तैलचित्र लावण्यात आले आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी विशेषत: महिला शिक्षणासाठी खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आज भारतामध्ये स्त्री शिक्षणाविषयी निर्माण झालेली जागृती ही फुले दाम्पत्याने केलेल्या कार्यामुळेच आहे. त्यामुळे फुले दाम्पत्याने केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मंत्रालय मुख्य इमारतीमध्ये त्यांचे संयुक्त तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली होती.

हेही वाचा :

The post Chhagan Bhujbal : फुले दाम्पत्याचे तैलचित्र मंत्रालयात; निर्णयाबद्दल भुजबळांकडून आभार appeared first on पुढारी.