Chhagan Bhujbal : येवला आठवडे बाजार स्थलांतरित करा : भुजबळांच्या सूचना

छगन भुजबळ,www.pudhari.news

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येवला आठवडे बाजार रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि नगरपालिका यांनी समन्वयातून पुढील आठ दिवसांत पर्यायी जागेवर बाजार बसविण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना माजी मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

येवला आठवडे बाजाराच्या जागेच्या प्रश्नांबाबत येवला येथील संपर्क कार्यालयात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, नायब तहसीलदार पंकजा मगर, सहायक निबंधक प्रताप पाडवी, माजी नगरसेवक प्रवीण बनकर, दीपक लोणारी, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, सचिन कळमकर, संतोष खैरनार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, येवला शहरात मंगळवारी भरणारा आठवडे बाजार रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे आठवडे बाजाराचे नियोजन पर्यायी जागेत करावे. कुठल्याही परिस्थितीत आठवडे बाजार हा पुढच्या आठ दिवसांत पर्यायी जागेवर बसविण्यात यावा. मुख्य बाजारतळावर सुरू असलेली कामे महिनाभरात पूर्ण करावेत व वाहतुकीस येणारे अडथळे दूर करावे. शहरातील कोणत्याच रस्त्यावर विक्रेते बसणार नाही, याची दक्षता घ्यावी. शहरातील रस्ते मोकळे आणि स्वच्छ असले पाहिजे, यासाठी नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी समन्वयातून हा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

हेही वाचा :

 

The post Chhagan Bhujbal : येवला आठवडे बाजार स्थलांतरित करा : भुजबळांच्या सूचना appeared first on पुढारी.