Chitra Wagh : जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार चिंताजनक

चित्रा वाघ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

रोजगाराच्या शोधात सिन्नरमध्ये आलेल्या एका महिलेचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रविवारी (दि.१२) केला. सदर महिलेची विक्रीदेखील करण्याचा प्रयत्न झाला असून, हा गंभीर प्रकार असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये धर्माच्या नावाखाली भोंदुगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या चित्रा वाघ यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी पीडित महिला व तिचे कुटुंबीय हजर होते. वाघ पुढे म्हणाल्या की, मूळची संगमनेरची व मुंबईत वास्तव्यास असलेली पीडित महिला सिन्नरच्या माळेगाव व मुसळगाव एमआयडीसी येथे रोजगाराच्या शोधार्थ आली. यावेळी दोघांनी तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडे नेले. सदर व्यक्तीने जबरदस्तीने पीडितेचे धर्मांतरणाचा प्रयत्न करताना त्याच्यासह अन्य दोघांनी तिच्यावर महिनाभर अत्याचार केले. पीडितेला डांबून ठेवत तिच्या लहान मुलाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे वाघ यांनी सांगितले.

पीडितेच्या पतीने पोलिसांच्या मदतीने या सर्व प्रकारातून सदर महिलेची सुटका केली. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपीसह दाेघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाईची मागणी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे केली आहे. दरम्यान, राज्य महिला आयोग महिलांवरील अत्याचार राेखण्यात कमी पडतो आहे का, असा प्रश्न वाघ यांना केला असता, जो-तो त्याचे काम करतो आहे. राज्यातील धर्मांतराचे रॅकेट उखडून फेकण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्याची विनंती शासनाला करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

हेही वाचा : 

The post Chitra Wagh : जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकार चिंताजनक appeared first on पुढारी.