Corona : मार्चएंड नाशिककरांसाठी अंगावर काटा आणणारा! एका महिन्‍यातील सर्वाधिक वाढ

नाशिक : यंदाच्‍या वर्षीचा मार्चएंड नाशिककरांसाठी अंगावर काटा आणणारा ठरला असून, याचे कारण म्‍हणजे गेल्‍या महिनाभरात जिल्ह्यात झालेला कोरोनाचा फैलाव आहे. यातून या महिन्‍यात आढलेल्‍या एकूण कोरोनाबाधितांची संख्याही सर्वाधिक ठरली.

मार्चमध्ये जिल्ह्यात‍ आढळले ५८ हजार ७१२ बाधित 

मार्चमध्ये जिल्ह्यात तब्‍बल ५८ हजार ७१२ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, एका महिन्‍यात आढळलेली कोरोनाबाधितांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात २८७ बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. या महिनाभरात चाचण्यांची संख्यादेखील सर्वाधिक राहिली असून, एक लाख ९८ हजार ९३२ चाचण्या जिल्‍हाभरात केल्‍या आहेत. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

एका महिन्‍यातील सर्वाधिक वाढ

गेल्‍या वर्षी २९ मार्चला जिल्ह्यात पहिला रुग्‍ण आढळल्‍यानंतर सुरवातीचे मे २०२० अखेर एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक हजारांच्‍या आतच होती. परंतु मार्च २०२१ संपत असताना जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ८१ हजार ५२२ वर पोचली आहे. गेल्‍या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वाधिक कोरोनाबाधित सप्‍टेंबर २०२० मध्ये आढळून आले होते. या महिन्‍यात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या ३८ हजार ४९० होती. परंतु मार्च २०२१ मध्ये अनेकदा दर दिवशी आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने नवीन विक्रम गाठले.

चाचण्यांची संख्याही राहिली सर्वाधिक 

यातून या महिन्‍यात आढलेल्‍या एकूण कोरोनाबाधितांची संख्याही सर्वाधिक ठरली. सरासरी दोन हजार कोरोनाबाधित रोज आढळले असून, मार्चमध्ये जिल्ह्यात ५८ हजार ७१२ कोरोनाबाधित आढळले आहेत. महिनाभरात एक लाख ९८ हजार ९३२ चाचण्या केल्‍या आहेत. आत्तापर्यंत सर्वाधिक चाचण्यादेखील मार्चमध्येच झालेल्‍या आहेत. यापूर्वी सप्‍टेंबर २०२० मध्ये एक लाख ३६ हजार ५८० चाचण्या झाल्‍या होत्‍या. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

अकरा दिवसांत १८२ बाधितांचा मृत्‍यू 
मार्चमध्ये जिल्ह्यात २८७ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यापैकी तब्‍बल १८२ मृत्‍यू शेवटच्‍या अकरा दिवसांत २१ मार्चनंतर झाले आहेत. उर्वरित १०५ मृत्‍यू १ ते २० मार्चदरम्‍यान झाले आहेत. दरम्‍यान, आत्तापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक ४९८ मृत्‍यू सप्‍टेंबर २०२० मध्ये झाले आहेत. 

महिनानिहाय आढळलेल्‍या कोरोनाबाधितांची संख्या अशी- 
महिना आढळलेले कोरोनाबाधित 

जून २०२० पर्यंत ४, ११४ 
जुलै २०२० १०, ३०२ 
ऑगस्‍ट २०२० २२,९७० 
सप्‍टेंबर २०२० ३८, ४९० 
ऑक्‍टोबर २०२० १७, ७९५ 
नोव्‍हेंबर २०२० ७,४६६ 
डिसेंबर २०२० ८, ९८२ 
जानेवारी २०२१ ५, ६९५ 
फेब्रुवारी २०२१ ६,९९६ 
मार्च २०२१ ५८,७१२