Corona Update : नाशिक जिल्ह्यात चिंता वाढली! कोरोना रुग्‍ण संख्येचा पुन्हा नवा उच्चांक

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना रुग्‍ण संख्या वाढीचे रोज नवनवे उच्चांक होत आहेत. त्‍यातच बुधवारी (ता.२४) जिल्‍हाभरात तब्‍बल ३ हजार ३३८ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, पहिला रुग्‍ण आढळल्‍यापासून प्रथमच तीन हजाराहून बाधित एका दिवसात आढळले आहेत. दुसरीकडे कोरोनामुळे बळींच्‍या संख्येतही वाढ होत असून, दिवसभरात पंधरा बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक दहा मृत नाशिक शहरातील आहेत. २ हजार २२४ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. 

कोरोनाचा पहिला बाधित गेल्‍या वर्षी २९ मार्चला आढळला होता. त्‍यानंतर जुलै-ऑगस्‍ट महिन्‍यात जिल्‍ह्‍यात रुग्‍णसंख्या वाढीने उच्चांकी गाठली होती. परंतु त्‍यानंतरच्‍या काळात नव्‍याने आढळणार्या कोरोना बाधितांचा आलेख खालावत होता.परंतु गेल्‍या काही दिवसांपासून दर दिवशी आढळणार्या कोरोना बाधितांची संख्या नवनवीन उच्चांक गाठते आहे. बुधवारी (ता.२४) दिवसभरात आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये १ हजार ८४९ बाधित नाशिक महापालिका हद्दीतील असून, १ हजार १९१ बाधित नाशिक ग्रामीण भागात आढळले आहेत. मालेगावच्‍या २४५ रुग्‍णांचे तर जिल्‍हा बाहेरील ५३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १ हजार ५६९, नाशिक ग्रामीणमधील ३९३, मालेगाव महापालिका हद्दीतील २३१ तर जिल्‍हाबाहेरील ३१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. सायंकाळी उशीरापर्यंत ५ हजार १०४ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी २ हजार ८८७ रुग्‍ण नाशिक ग्रामीणमधील असून, नाशिक शहरातील १ हजार ४१५, मालेगावच्‍या ८०२ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा कायम होती. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्या वीस हजारांच्‍या उंबरठ्यावर 

जिल्‍ह्‍यात आढळलेल्‍या एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ५६ हजार ८९९ वर पोहोचली असून, यापैकी १ लाख ३६ हजार ३१५ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. सध्या जिल्‍ह्‍यात उपचार घेणार्या बाधितांची संख्या १८ हजार ३२२ वर पोहोचली आहे. अशी वाढ होत राहिली तर येत्‍या दोन-तीन दिवसांत ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्या वीस हजारांचा आकडा ओलांडण्याची भिती निर्माण झाली आहे. 

अठरा वर्षीय युवतीसह पंधरा बाधितांचा मृत्‍यू 

दिवसभरात कोरोनामुळे झालेल्‍या मृतांमध्ये नाशिक शहरातील दहा, ग्रामीणमधील तीन, मालेगाव व जिल्‍हा बाहेरील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. मुळची नगर जिल्‍ह्‍यातील कोपरगाव येथील १८ वर्षीय युवतीचा नाशिकला उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. नाशिक शहरात पंचवटीतील कालिकानगर येथील ४७ वर्षीय, तारवालानगर येथील ९५ वर्षीय, आडगाव परीसरातील ६८ वर्षीय पुरुष, उत्तमनगर येथील ५४ वर्षीय, सातपूर येथील ६४ वर्षीय पुरुष, विजय नगरच्‍या शिवाजी चौकीलातील ६० वर्षीय पुरुष, जुने नाशिकमधील दिनकर गल्‍लीतील ६५ वर्षीय महिला, जेलरोड परीसरातील ६५ वर्षीय, नेहरूनगर येथील ५३ वर्षीय पुरुष, गंगापूररोडवरील ८८ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. मालेगावला ५५ वर्षीय तर मोहपाडा (ता.सुरगाणा) येथील ८४ वर्षीय, वडनेरभैरव (ता.चांदवड) येथील ७० वर्षीय, येवल्‍यातील ६४ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. 
 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

राष्ट्रवादीचे पगार यांना कोरोनाची लागण 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी यासंदर्भात माहिती दिली असून सध्या ते गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. १५ मार्चला ॲड.पगार यांनी कोविड-१९ प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर शुक्रवार रात्री पासुन थोडा ताप आला होता. लस घेतल्यामुळे कदाचित ताप आला असेल असे त्यांना वाटले. परंतु ताप कमी होत नसल्याने कोवीडची चाचणी केली असता पॅाझिटिव्ह आली आहे. दरम्‍यान संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ॲड.पगार यांनी ट्विटरमध्ये केले आहे. 

राज्‍यातील बुधवारी अन्‍य शहरांची स्‍थिती अशी- 

क्षेत्र कोरोना बाधित मृत्‍यू बरे झालेले रुग्‍ण 
नाशिक जिल्‍हा ३,३३८ १५ २,२२४ 
पुणे महापालिका क्षेत्र ३,५०९ २४ १,४१० 
बृहंन्‍मुंबई महापालिका क्षेत्र ५,१८५ ०६ २,०८८