नाशिक : गेल्या काही दिवसांत शहरात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे बोलले जात असले, तरी नागरिकांना फक्त ठराविक हॉस्पिटलचाच आग्रह असून, शहरात अद्यापही ९२१ ऑक्सिजन बेड शिल्लक असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. मागील चार दिवसांत ३६ रुग्णालयांमध्ये एक हजार १९ बेड नव्याने वाढविण्यात आल्याने शहरातील ११९ रुग्णालयांमध्ये आता चार हजार ५६५ बेड उपलब्ध झाल्याची माहिती दिली.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, रुग्णालयांमध्ये बेड फुल होत असल्याचे वास्तव आहे. मात्र, महापालिकेने शहरात ११९ रुग्णालये कोविड म्हणून घोषित करताना, ऑक्सिजन बेडची पुरेशी व्यवस्था केल्याचा दावा आयुक्त कैलास जाधव यांनी केला. महापालिकेने डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दीडशे, तर नवीन बिटको रुग्णालयात ५०० बेड उपलब्ध करून दिले आहेत. समाजकल्याण कोविड सेंटर सुरू केले. ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढल्यानंतर ८३ खासगी रुग्णालयांत तीन हजार ५४६ बेड उपलब्ध करून दिले आहेत. त्यानंतरही बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने मागील चार दिवसांत खासगी रुग्णालयांची संख्या ११९ पर्यंत पोचविली. नवीन ३६ रुग्णालयांमध्ये एक हजार १९ बेड वाढविण्यात आल्याने खासगी रुग्णालयांतील बेडची संख्या चार हजार ५६५ पर्यंत पोचली आहे.
हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण
ठराविक रुग्णालयांचा आग्रह
रुग्णांना शहरात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र, वास्तवात ९२१ ऑक्सिजन बेड रिक्त असल्याचे महापालिकेच्या डॅशबोर्डवर दिसत आहे. एक हजारावर सर्वसाधारण बेड शिल्लक आहेत. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णालयांची माहिती नाही व ठराविक रुग्णालयांमध्येच रुग्ण दाखल करण्याचा आग्रह असल्याने समस्या निर्माण होत असल्याचा दावा आयुक्त जाधव यांनी केला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सर्वच कोविड रुग्णालयांची माहिती नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी घरापर्यंत पत्रके वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी माहिती दिली.
हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड