Coronavirus : नाशिक महापालिका मुख्यालयात सन्नाटा; १३४ कर्मचारी पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू

नाशिक : कोरोना संसर्गाला महापालिका प्रशासन तोंड देत असताना, फील्डवर काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाने घेरले असून, आतापर्यंत तब्बल १३४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील ११५ कर्मचारी बरे झाले असून, १५ कर्मचारी अद्यापही उपचार घेत आहेत. चार कर्मचाऱ्यांना मृत्यूने कवटाळले आहे. 

शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी महापालिका कर्मचाऱ्यांवर आहे. त्यात वैद्यकीय, आरोग्य, कर आदी विभागांकडे अधिक जबाबदारी आहे. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी कर्मचारी झटत असताना, अनेकांना लागण झाली आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेचे १३४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. गेल्या वर्षी कर्मचारी कोरोनाने आजारी पडण्याचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. कर्मचाऱ्यांबरोबरच अधिकाऱ्यांनाही कोरोनाने गाठले आहे. गेल्या आठवड्यात वैद्यकीय विभागातील प्रमुख अधिकारी कोरोनाग्रस्त आढळले. त्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे यांचा समावेश आहे. याचदरम्यान मुख्यालयात १४ कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळल्याने महापालिकेची यंत्रणा हादरली आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

मुख्यालयाची दारे बंद 

महापालिका मुख्यालयात कोरोना स्प्रेडर्सची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त कैलास जाधव यांनी मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त अन्य प्रवेशद्वारे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना लेखी परवानगीशिवाय प्रवेश देणे बंद केले आहे. लेखी सूचना किंवा पास प्राप्त झाल्यानंतरच अत्यावश्यक तेवढ्याच व्यक्तींना प्रवेश दिला जात आहे. नगरसेवकांसोबत फक्त तिघांना प्रवेश दिला जात आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाईच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या आहेत.  

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण