‘CoWIN’ लसीकरण Appने वाढवलीय डोकेदुःखी! पाच मिनिटांच्या कामासाठी अर्धा ते दोन तास वाया

नाशिक : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी राष्ट्रीय स्तरावर विकसित करण्यात आलेल्या को-विन लसीकरण ॲपमुळे लसीकरणाचे काम सुलभ होण्याऐवजी ॲपने डोकेदुःखी वाढवलीय. ॲपवर नोंदणी केल्यावर लसीकरणासाठी लागणाऱ्या पाच मिनिटांच्या कामासाठी १५ मिनिटे, अर्धा तासापासून दोन तास ताटकळावे लागत असल्याची विदारक परिस्थिती पाहावयास मिळत आहे. मुळातच देशपातळीसाठी हे ॲप विकसित करत असताना त्याच्या उपयोगितेचा कितपत विचार झाला आहे, असा प्रश्‍न आरोग्य यंत्रणेला भेडसावू लागला आहे. 

को-विन लसीकरण ॲपने वाढवलीय डोकेदुःखी 
नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ शहरवासीय गेले असताना दोन तासांहून अधिक काळ झाला, तरीही लसीकरण कसे होत नाही, असा प्रश्‍न पडल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. त्यावर ॲपवर नोंदणी केली असली, तरीही माहिती ॲपवर उपलब्ध होत नाही, असे कारण पुढे आले. मग माहिती कशी उपलब्ध होत नाही हे पडताळणी पाहिल्यावर ॲपला ‘स्पीड’ मिळत नसल्याची बाब स्पष्ट झाली. सद्यःस्थितीत कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रभागी असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाचे काम सुरू आहे.

पाच मिनिटांच्या कामासाठी अर्धा ते दोन तास ताटकळावे लागतेय 
ॲप ‘हँग’ होणे, ‘स्पीड’ मिळत नाही म्हटल्यावर आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाला त्यांच्या भागातील कोमऑर्बिड आणि ज्येष्ठांची माहिती संकलित करून ॲपवर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही भागात आदल्या दिवशी नोंदणी होत आहे. पण तरीही ॲपच्या माध्यमातून लसीकरण ‘युझर फ्रेंडली’ होत नसल्याने ॲप लसीकरणामध्ये अडथळा ठरतो काय, अशा शंकेची पाल यंत्रणेमध्ये चुकचुकू लागली आहे. 

लसीकरणाचा वेग मंदावला 
कोरोना लसीकरणाला आरोग्य क्षेत्रापासून सुरवात झाल्यावर लसीकरणाच्या याद्या अपलोड करायला सांगण्यात आले. ॲपमध्ये लसीकरण केंद्राची स्वतंत्र ‘साइट’ करायला सांगण्यात आली होती. पण ‘साइट’ तयार होण्यात अडचणी आल्या. एवढे करूनही नोंदणी झाली, तरीही अनेकांना लसीकरणाच्या निरोपाचा एसएमएस गेले नसल्याची बाब स्पष्ट झाली. त्यावर उपाय म्हणून लसीकरणासाठी फोन करून बोलविण्याची वेळ आली. याचा सारा परिणाम म्हणजे, लसीकरणाचा वेग वाढण्यात अडचणी आल्या आहेत. त्यावर उपाय म्हणून ॲपवर नोंदविलेला मोबाईल क्रमांक तपासून पाहण्याची मुभा देण्यात आली आणि लसीकरणाचे प्रमाण वाढण्यासाठी काहीशी मदत झाली. 
कोमऑर्बिड आणि ६० वर्षे ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी दोन बाबी स्पष्ट करण्यात आल्या. एक म्हणजे, जागेवर आधारकार्डसह इतर बाबींच्या आधारे नोंदणी करून लसीकरण करायचे. दुसरे म्हणजे, आदल्या दिवशी नोंदणी करून लसीकरण करायचे. मात्र ॲपमध्ये नोंदणी झाली नसल्यास लसीकरण करायचे नाही, असे आदेश देण्यात आले आहेत. मुळातच, सरकारी आरोग्य यंत्रणा निरनिराळ्या ॲपचा उपयोग करत असल्याने तांत्रिक त्रुटी येतात हे अनेकांच्या ध्यानात येते. मात्र खासगी ठिकाणी ॲपचा वापर ‘युझर फ्रेंडली’ होत नसल्याने लसीकरणाचा विलंब टळण्याचे नाव घेताना दिसत नाही. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड
 
सरकारी यंत्रणेवरील विश्‍वासाचा अभाव 
ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या लसीकरणात आढळलेल्या त्रुटींमुळे सरकारी यंत्रणेवर विश्‍वासाचा अभाव असल्याची बाब एव्हाना यंत्रणेतील मनुष्यबळामध्ये गच्च झाली आहे. मुळातच, देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाची व्यवस्था तयार असल्याने त्यादृष्टीने अधिक सुलभ लसीकरण कसे होईल याचा विचार व्हायला हवा, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून होणाऱ्या लसीकरणाच्या याद्या रोजच्या रोज ‘अपलोड’ करायला सांगून ‘थर्ड पार्टी’च्या माध्यमातून त्याचे परीक्षण करणे सोयीचे होईल काय, याबद्दल केंद्र सरकारने निर्णय घ्यायला हवा, असेही तज्ज्ञांना वाटते आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO