Crime : ओळख लपवून राहत होता, फरार आरोपी नाशिकमध्ये जेरबंद

Arrest

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सतरा वर्षांपूर्वी मालकाचा खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्याला पॅरोल मंजूर झाला. मात्र मुदतीनंतर पुन्हा कारागृहात न येता फरार झालेल्या आरोपीला गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. अनिल उर्फ आमिन भुलईकुमार भोई (३८, रा. ओडिशा) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तो चुंचाळेतल्या दत्तनगर परिसरात मित्रांच्या खोलीत वर्षभर ओळख लपवून राहात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या कालावधीत त्याने टवाळखोरीसह गुन्हेगारी कृत्य केल्याचे समोर येत आहे.

अनिल भोईने २००६ मध्ये चेंबूर येथे मालकाचा खून केला होता. या प्रकरणात त्याला शिक्षा झाल्याने त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होता. शिक्षा भोगत असताना ६ एप्रिल २०२२ मध्ये त्याला ४५ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला होता. पॅरोलची मुदत संपल्यावर भोईने कारागृहात हजर राहणे अपेक्षित असताना तो आला नाही व फरार झाला. त्यामुळे त्याच्या पॅरोलसाठी जामीनदार असलेले नातलग पुणे येथील असल्याने पोलिसांनी पुणे येथे अनिलविरोधात गुन्हा दाखल केला. या कालावधीत स्वत:चे अस्तित्व लपवत अनिल त्याच्या मित्रांच्या मदतीने दत्तनगर परिसरात वास्तव्यास होता. ही माहिती गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळाली. त्यांनी सहायक उपनिरीक्षक मलंग गुंजाळ यांना सापळा रचण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अंमलदार सुनील आडके, राजेश सावकार, डी. के. पवार, कैलास चव्हाण, तुकाराम शेळके, प्रदीप ठाकरे, महेंद्र बेंडकोळी, गणेश नागरे, सचिन पाटील, संदीप आंबरे, बाळासाहेब सोनकांबळे आणि दिनेश धकाते यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याला पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात हजर करण्यात आले आहे.

ओळख लपवून वास्तव्य

अनिल हा स्वत:ची ओळख लपवून अंबड परिसरात राहात होता. दाढी वाढवून तो वास्तव्य करीत होता. ओडिशातील त्याच्या मित्रांसोबत एका खोलीत राहात असताना त्याने टवाळखोरीही केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. त्यामुळे अंबड, सातपूर परिसरात गुन्हेगारांना वास्तव्यासाठी सहज जागा उपलब्ध होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

हेही वाचा : 

The post Crime : ओळख लपवून राहत होता, फरार आरोपी नाशिकमध्ये जेरबंद appeared first on पुढारी.