Crime : जळगावचा सुपारी किलर मुंबई पोलिसांच्या ताब्यात

अटक,www.pudhari.news

जळगाव : शहरात गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या प्रवीण विनोद शिंदे (वय २१,रा. हरिविठ्ठलनगर ) यास ३ जुलै रोजी रामानंदनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या जवळून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. त्याला प्रारंभी पोलीस आणि नंतर न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. दरम्यान, याच तरूणाने मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Crime

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबईतल्या साकीनाका (मुंबई) येथे संदीप सरवणकर व प्रफुल्ल पवार हे दोघे भागीदारीत हॉटेल चालवत होते. तर, प्रवीण विनोद शिंदे (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर) व त्याचा मुंबईतील मित्र सागर मराठे दोघे शेजारच्याच कोकण किनारा या हॉटेलमध्ये काम करीत होते. सरवणकर व पवार यांच्यात पैशांवरून खटके उडत होते. यातूनच सरवणकर याने प्रवीणला २० हजार रुपयांची सुपारी दिली. या अनुषंगाने १ जुलै रोजी शहापूर येथील खर्डी गावाजवळ प्रवीणने पवार यांच्यावर पिस्तूलने गोळी झाडून त्यांचा खून केला. त्यानंतर प्रवीण जळगावात पळून आला. Crime

येथेच पिस्तुलच्या बळावर दहशत माजवत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला गजाआड केले. दुसरीकडे प्रफुल्ल पवार यांच्या खून प्रकरणी ३ जुलै रोजी शहापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी सागर मराठेला अटक करून चौकशी केली असता त्याने आपल्या सोबत प्रवीण विनोद शिंदे (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) हा देखील यात सहभागी असल्याची माहिती दिली. या अनुषंगाने शहापूर पोलिसांनी प्रवीण शिंदे याला ताब्यात घेतले आहे. Crime

हेही वाचा :

The post Crime : जळगावचा सुपारी किलर मुंबई पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.