Site icon

Crime : धुळ्यात आराम बस मधून गुटख्याची तस्करी, सहा जणांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आराम बस मधून गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हाणून पाडला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे शहरा लगत असणाऱ्या टोल नाक्यावर या दोन्ही बसमधून सोळा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आराम बससह 76 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली आहे.

मध्यप्रदेशातून शिर्डी कडे जाणाऱ्या आराम बस मधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश गोराडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांना दिली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, तसेच संजय पाटील, संदीप सरग, पंकज खैरमोडे, मयूर पाटील, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, तुषार पारधी, किशोर पाटील, सुनील पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांनी टोलनाक्यावर सापळा लावला.

यावेळी मध्य प्रदेशाकडून आलेल्या एन एल 07 बी 0 541 आणि एन एल 07 बी शून्य 0545 या दोन आराम बस पथकाने थांबवल्या. या गाड्यांची तपासणी केली असता दोन्ही गाड्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि गुटखा आढळून आला आहे. या संदर्भात मोहम्मद रईस गुलजार अहमद, शेख रमजान शेख शुभराती, रघुराज दुर्गा मीना तसेच मोहम्मद अश्रफी अब्दुल अजीज, शेख राजेश गणेश बिसोदिया, हरिप्रसाद जल्लू यादव या सहा जणांना अटक केली आहे. हा गुटखा मध्य प्रदेशातून शिर्डी कडे जाणार असल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली असून गुटख्याच्या साठ्यासह काही गोळ्यांचा साठा देखील आढळून आला आहे. या गोळ्यांची अन्न आणि औषध विभागाकडून तपासणी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

दरम्यान गुटख्याच्या तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या दोनही आराम बस पोलीस पथकाने जप्त केले आहे. तत्पूर्वी या आराम बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना धुळे येथील बस स्थानकात आणून त्यांना बसद्वारे शिर्डी पर्यंत जाण्याची व्यवस्था पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांनी करून दिली.

हेही वाचा :

The post Crime : धुळ्यात आराम बस मधून गुटख्याची तस्करी, सहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version