Crime : मध्यप्रदेशातून पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या सहा तरुणांना अटक

अटक,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मध्य प्रदेशातील उंबरटी येथून पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या नाशिक शहरातील पाच तरुणांसह सहा जणांना सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या सर्व सहा तरुणांकडून तीन पिस्तुलांसह मॅक्झिन आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शिक्षण घेण्याचे वय असणाऱ्या या तरुणांकडून घातक शस्त्र मिळाल्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील चिंता व्यक्त केली आहे.

मध्य प्रदेशातून येणाऱ्या एका कारमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जाणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी या मार्गावर गस्त वाढवत असतानाच संशयित गाड्यांची तपासणी सुरू केली. यावेळी तपासणी करणाऱ्या एका पथकाने शेवरलेट गाडी चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र या गाडी चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवण्यास सुरुवात केल्याने पोलीस पथकाने शेवरलेट गाडीचा पाठलाग सुरू केला. पोलीस पथकाने शिरपूर तालुक्यातील भोईटी शिवारात शेवरलेट गाडीला ओव्हरटेक करून थांबवले. यावेळी गाडीमध्ये सहा तरुण असल्याचे निदर्शनास आले. पोलीस पथकाने या सहाही तरुणांची चौकशी सुरू केली. यावेळी त्यांच्या उत्तरात विसंगती आढळल्याने तसेच टाळाटाळ करणारी उत्तरे मिळत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना संशय आला. त्यांनी गाडीची झडती घेतली असता गाडीच्या एका सीट खालून तीन पिस्तूल तसेच मॅक्झिन आणि जिवंत काढतुस आढळून आले.

पोलीस चौकशीत या तरुणांची नावे मोहितराम तेजवानी, आकाश विलास जाधव, राज प्रल्हाद नंदुरिया, अजय जेठा बोरीस, श्रीनिवास सुरेंद्र कानडे सर्व राहणार नाशिक तसेच शिरपूर तालुक्यातील होणारे होळनाथे येथील दर्शन चमनलाल सिंधी अशा सर्व सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या तरुणांनी ही घातक शत्रे मध्य प्रदेशातील उंबरठी येथून घेतली असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. शिक्षण घेण्याचे वय असणाऱ्या अशा तरुणांना गुन्हेगारीच्या खाईत टाकणाऱ्या मुख्य हत्यार तस्कराला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून त्याला गजाआड करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी यावेळी दिली आहे.

हेही वाचा : 

The post Crime : मध्यप्रदेशातून पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या सहा तरुणांना अटक appeared first on पुढारी.