Devendra Fadnavis…म्हणून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याच हाती येणार, देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

देवेंद्र फडणवीस

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धनुष्यबाण नेमका कोणाचा या संदर्भातील दोन्ही पक्षांचे दावे निवडणूक आयोगासमोर पोहोचले आहे. पण आमचे समर्थन धनुष्यबाणा सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे. सर्वाधिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे असल्यामुळे जनतेने दिलेला धनुष्यबाण मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हातात देणार आहे. तसेच सुनावणीअंती निवडणूक आयोग देखील त्यांच्याच हाती धनुष्यबाण देईल अशी मला अपेक्षा आहे. अर्थात निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे या संदर्भातील निर्णय त्यांनाच घ्यायचा असल्याचे सूचक वक्तव्य आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोंडाईचा येथे केले.

दोंडाईचा येथे उद्योगपती सरकार साहेब रावळ यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राज्याचे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी केले. या कार्यक्रमात खा. डॉ. सुभाष भामरे, माजी नगराध्यक्ष नयनकुवर रावल, राज्याचे माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आ. अमरीशभाई पटेल, आ. संजय सावकारे, आ. राजेश पाडवी, आ.सीमा हिरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, लक्ष्मण सावजी, आ. काशीराम पावरा भाजपचे धुळे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार रावल यांना लांब इनिंग खेळायची असल्याचे सांगून त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी देणार असल्याचे सूचक वक्तव्य देखील केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, दोंडाईचा येथील जनतेने आपल्याला हनुमंतांची गदा देऊन स्वागत केले. मात्र ही गदा आपण आधीच चालवली असल्याने राज्यात सत्तेत परिवर्तन झाले आहे. आता गदा चालवण्याची आवश्यकता नाही. आता या राज्यात हनुमान चालीसा म्हणण्यावर कोणतीही बंदी नाही. कोणीही केव्हाही हनुमान चालीसा म्हणू शकतो. त्यामुळे ही हनुमंताची गदा पूजेसाठी असून कुणाचेही डोक्यावर चालवण्यासाठी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात धनुष्यबाण नेमका कुणाचा यावर निवडणूक आयोग फैसला करेल. यासाठी दोन्ही पक्षांचे दावे त्यांच्यासमोर पोहोचले आहे. पण आमचे समर्थन धनुष्यबाणासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे. राज्यात शिवसेनेचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने आहे. त्यामुळे जनतेने दिलेला धनुष्यबाण हा मी त्यांच्याच हातात देणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे सर्व सुनावणी झाल्यानंतर परिस्थितीनुसार तसा निकाल येईल अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हाती धनुष्य येईल यासाठी त्यांना आपण अग्रिम शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अर्थात निवडणूक आयोग ही स्वायत्त्य संस्था असून या संदर्भातील निर्णय त्यांनाच द्यायचा आहे. अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली आहे. दोंडाईचा परिसरात दादासाहेब रावळ यांनी शेतकऱ्याला स्थैर्य देण्यासाठी स्टार्च फॅक्टरी सुरू केली. 50 वर्षांपूर्वी त्यांनी घेतलेला हा निर्णय आज शेतीला मदत करणारा दिसून येतो. शेतीला स्थैर्य शेतीपूरक व्यवसायावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करून देता येणे शक्य असल्याचे त्यावेळी त्यांनी हेरले. गेली 50 वर्ष त्यांनी हा उद्योग सचोटीने चालवला. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. राज्यातील नवीन सरकार हे पंतप्रधान मोदी यांच्या आदेशाने एग्रीकल्चर कॉलेजच्या कोर्स मध्ये आधुनिकता आणणार आहे. शेतीत नवनवीन संशोधन होत आहेत. याची माहिती विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. जैविक शेती कशी करता येईल यासाठी अभ्यासक्रमात आधुनिक शाश्वत शेतीकडे नेता येणारा अभ्यासक्रम करणार असल्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

The post Devendra Fadnavis...म्हणून धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याच हाती येणार, देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य appeared first on पुढारी.