Dhule : पिंपळनेरच्या शेलवाडी घाटात ‘बर्निंग कार’चा थरार ; दोघे थोडक्यात बचावले

धुळे, पिंपळनेर :  पुढारी वृत्तसेवा
नाशिककडून पिंपळनेरकडे येणाऱ्या होंडा अमेझ या कारने पहाटे ४ ते ४:३० वाजेदरम्यान शेलबारी घाटाजवळ अचानक पेट घेतला. त्यात पिंपळनेर येथील सागर राजेंद्र घरटे व भाऊ भामरे यांनी वेळीच कार बाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवला याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत राजेंद्र घरटे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा सागर घरटे, गौरव भामरे हे दोन्ही मित्र नाशिककडून पिंपळनेरला होंडा अमेझ (एमएच १८/ एजे-२०१९) या वाहनाने येत असताना शेलवारी ओलांडल्यानंतर सागर घरटे यांना कारमधून काहीतरी जळत असल्याचा वास आला. खाली उतरून तपासणी करत असताना दोन्ही मित्रांना अचानक कारच्या इंजिनमधून धूर बाहेर येताना दिसला. दोघांनी वेळीच कारपासून दूर उड्या मारल्या. त्याचवेळी कारमधील बॅटरीचा स्फोट झाला व कार क्षणात मोठ्या ज्वालांनी वेढली गेली. कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांचा थोडक्यात जीव बचावला. भर रस्त्यावर पहाटे बर्निंग कारचा थरार पाहून रस्त्याने येणारी वाहने थांबून गेली होती. या घटनेत कारचे नुकसान झाले असले तरी जीवित हानी झाली नसल्याने अनर्थ टळला.

घटनास्थळी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी धाव घेतली व घटनेची माहिती नोंदवून घेतली असून पुढील तपास सपोनि सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना सोनवणे करीत आहेत.

हेही वाचा :

The post Dhule : पिंपळनेरच्या शेलवाडी घाटात 'बर्निंग कार'चा थरार ; दोघे थोडक्यात बचावले appeared first on पुढारी.