Dhule : राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात

शिवसेना,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे निषेध करण्यात आला. धुळे शहर आणि शिंदखेडात झालेल्या आंदोलनात या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा असणाऱ्या बॅनरला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचे आता धुळ्यात तीव्र पडसाद पडताना स्पष्ट दिसून येत आहे. आता या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना मैदानात उतरली असून धुळे शहरात आणि शिंदखेडा येथे निदर्शने करीत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंग कोश्यारी यांची नियुक्ती झाल्यापासून ते राज्यपाल म्हणून कमी व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून जास्त काम करत आहे. यापूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानजनक, जनतेत प्रक्षोभ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. आता त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल अवमान करणारे वक्तव्य केले. राज्यपालपद हे घटनेने निर्माण केलेले पद असून त्यावर बसणाऱ्या व्यक्तीला सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यासारखे बोलणे शोभत नाही. त्यातच भाजपचे प्रवक्ते खा. सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्यामुळे भाजपचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. छत्रपतींचा अवमान हा महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचा अवमान आहे. हा अवमान शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) कदापि सहन करणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी दिली.

शिंदखेडा झालेल्या आंदोलन प्रसंगी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, युवासेना युवाधिकारी आकाश कोळी, दोंडाईचा कृ.उ.बा.समिती संचालक सर्जेराव पाटील, उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, विधानसभा संघटक गणेश परदेशी, तालुकाप्रमुख गिरीश देसले, आदी उपस्थित होते.

धुळे शहरात झालेल्या आंदोलन प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, माजी आ.प्रा. शरद पाटील, माजी महापौर भगवान करनकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील, ङाॅ.सुशील महाजन, ललित माळी, भरत मोरे, पिंटुभाऊ शिरसाठ, देविदास लोणारी, संदिप सुर्यवंशी, विनोद जगताप, हिमांशु परदेशी, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Dhule : राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्याविरोधात शिवसेना मैदानात appeared first on पुढारी.