Dhule : जिद्द अन् चिकाटीच्या इंधनावर धीरज’ने घातली यशाला गवसणी

धीरजची यशाला गवसणी,www.pudhari.news

अंबादास बेनुस्कर, धुळे (पिंपळनेर) :

जिद्द चिकाटी आणि मेहनत या यशाच्या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास कुठलेही यश आपल्यापासून फार काळ दूर राहू शकत नाही. हे खरे करुन दाखवले आहे, धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील शेवाळी गावच्या धीरज ने…, बारावीची परीक्षा होते ना होते तोच धीरजच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. मात्र अशा परिस्थितही न डगमगता धीरज मार्गक्रमण करत होता. आईच्या कष्टाची व भावाच्या त्यागाची जाणिव ठेवून धीरज आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या केंद्र शासनाशी संलग्न अशा अग्रगण्य कंपनीत अधिकारी बनला आहे.

जिद्द ठेऊन प्रयत्न करत राहिल्यास अपेक्षित यश निश्चित प्राप्त होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) येथील धीरज संजय जाधव या तरुणाच्या यशातून अधोरेखित होते. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत धीरजने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या केंद्र शासनाशी संलग्न अशा अग्रगण्य कंपनीत मिळविलेली उच्चपदस्थ नोकरी याच मेहनतीचे फळ आहे. शेवाळी (दा.) येथील अवघ्या २३ वर्षांच्या धीरजने केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाशी संलग्न इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफिसर या पदाची मुलाखत उत्तीर्ण होत नोकरी प्राप्त केली. या पदासाठी त्याला जवळपास १८ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळू शकणार आहे. अभियांत्रिकी शिक्षणातील ‘गेट’ (GATE) ही प्रवेश परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालेल्या धीरजने याच यशाच्या जोरावर ही नोकरी मिळविली.

संघर्षमय वाटचाल
धीरज हा आपली आई मनीषा आणि मोठा भाऊ चंद्रकांत यांच्यासोबत शेवाळी या गावातच राहतो. धीरजच्या लहानपणीच कौटुंबिक कारणातून आई-वडील विभक्त झाल्यानंतर धीरज आईसोबत खोरी (ता.साक्री) येथे आजोळी शिक्षणासाठी राहू लागला. याच ठिकाणी त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नववी आणि दहावीचे शिक्षण शेवाळी येथील माध्यमिक शाळेत तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण साक्री येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून पूर्ण केले. परिस्थितीत त्याने सीईटीची परीक्षा देत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत रायगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयात (स्वायत्त) केमिकल या विषयात बी.टेक.साठी प्रवेश मिळविला. या ठिकाणाहून बी. टेक पूर्ण केल्यानंतर २०२१ मध्ये गेटची परीक्षा उत्तीर्ण झाला परंतु यात त्याला अपेक्षित रैंक न मिळाल्याने त्याने २०२२ मध्ये पुन्हा गेटची परीक्षा देऊन ऑल इंडिया रैंकमध्ये ७१ वा क्रमांक पटकावला. यामुशे त्याला आयआयटी पवई येथे प्रवेश मिळाला.  त्याची इंडियन ऑइल कार्पोरेशनमध्येदेखील निवड होऊन मुलाखत झाली व ही मुलाखत उत्तीर्ण होत निवड झाली.आयआयटी तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये निवड होणारा धीरज जाधव हा शेवळी गावातील पहिलाच तरुण आहे.

भावाच्या त्यागाचे फळ
धीरजचे बालपण अतिशय संघर्षात गेले आहे. आई-वडील विभक्त झाल्यानंतर त्याची आई मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या माहेरी खोरी येथे धीरजसोबत राहू लागली. याच ठिकाणी त्यांनी शेतात मोलमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा शेवाळी येथे आजोबांकडे राहून शिक्षण घेत होता, तर धीरज त्यांच्यासोबतच खोरी येथे राहत होता. त्याला भाऊ चंद्रकांत याची देखील खंबीर साथ लाभली. चंद्रकांतने आपले शिक्षण काही काळासाठी थांबवून स्वतः नोकरी करत आर्थिक भार स्वतःच्या खांद्यावर घेत धीरजचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या या त्यागाचे धीरजने मात्र चीज करून दाखवल्याचे समाधान तो बोलताना व्यक्त करतो. या कठीण काळात आजोबा, मामा, काका यांनी खंबीर साथ दिल्याची भावना धीरजने बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा :

The post Dhule : जिद्द अन् चिकाटीच्या इंधनावर धीरज'ने घातली यशाला गवसणी appeared first on पुढारी.