Dhule : धुळ्याचे शहीद जवान मनोज गायकवाड यांना अखेरचा निरोप

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जम्मू कश्मीर येथे वीरमरण आलेले धुळ्याचे सुपुत्र मनोज गायकवाड यांना हजारो नागरिकांनी आज अखेरचा निरोप दिला. शहीद जवान गायकवाड यांच्या मुलाने मुखाग्नी दिल्यानंतर नागरिकांनी शहीद जवान अमर रहे, अशा घोषणा दिल्या. तर पोलिस आणि सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना दिली.

धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथे राहणारे मनोज गायकवाड हे 21 वर्षांपूर्वी सैन्य दलात दाखल झाले होते. ते सध्या नाईक पदावर जम्मू काश्मीर मध्ये सेवा बजावत होते. मात्र या भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव होत आहे. त्यामुळे वातावरण खराब झाले आहे. अशा वातावरणात सेवा करीत असताना अचानक हिमस्खलन झाले. यात जवान मनोज गायकवाड हे दाबले गेले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान आज त्यांचे पार्थिव चिंचखेडे गावात आणण्यात आले. यावेळी गावात सर्व रस्त्यांवर रांगोळी टाकून शहीद जवान अमर रहे असा संदेश लिहिण्यात आला. तर तरुणांनी गावात तिरंगा रॅली काढली.

देशभक्तीपर घोषणा देत शहीद जवान गायकवाड यांची अंत्ययात्रा निघाली. यानंतर त्यांचा मुलगा अथर्व याने मुखागनी दिला. तत्पूर्वी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार कुणाल पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान यावेळी बोलताना खासदार सुभाष भामरे यांनी शहीद जवानाच्या नातेवाईकांना केंद्राकडून एक कोटी रुपयांची मदत मिळणार असून राज्य सरकारकडून देखील तेवढीच मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच शहीद जवानाच्या परिवारातील एका सदस्यास नोकरीत सामावून घेतले जाणार असून त्यांचा मुलगा आणि मुलगी यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post Dhule : धुळ्याचे शहीद जवान मनोज गायकवाड यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.