Dhule : पिंपळनेर वासियांच्या ऐतिहासिक रास्तारोको’ला अखेर यश

पिंपळनेर रास्तारोको,www.pudhari.news

धुळे(पिंपळनेर): पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२-जी अक्षरश:खड्ड्यात हरवला आहे. पिंपळनेरहून ताहराबाद, सटाणा, नाशिककडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल वेळोवेळी आवाज उठविण्यात आला. परंतु, झोपलेले प्रशासन जागे झाले नाही. परिणामी, काल पिंपळनेरवासीयांनी शहरातून एकाचवेळी अनेक ठिकाणी महामार्ग अडवत ऐतिहासिक रास्ता रोको केला. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने जनता स्वच्छेने आंदोलनात सहभागी झाली. या आंदोलनामुळे सरकारी यंत्रणा चांगलीच हादरली. यावेळी एमएमआरडीएचे उपविभागीय अभियंता वानखेडे, तहसीलदार प्रवीण चव्हाणके आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत दोन दिवसांत कॉंक्रीटकरणाला सुरुवात होणार असल्याचा निर्णय झाला. तसे ठोस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.  तेव्हा महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.

पिंपळनेर शहरातून जाणारा ७५२-जी या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. महामार्गाचे काम रखडल्यामुळे रस्त्यांवरून जाताना प्रचंड धूळ उडते. अडचणींचा सामना करावा लागतो. खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासंदर्भात नागरिकांनी वेळावेळी तक्रारी केल्यात; तरीही कानाडोळा होत असल्याने पिंपळनेरकरांनी ‘बेमुदत महामार्ग बंद आंदोलनाची हाक दिली. सकाळी १० वाजेपासूनच आंदोलनाला सुरवात झाली. शहरातील पिंपळेनर चौफुली, बस स्टॅण्ड, सामोडा चौफुली आणि जे.टी.पॉइंट रस्त्यावर आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून धरला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

आंदोलनकर्त्याची गायीले भजन!
यावेळी आंदोलनकर्त्यांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हरे राम हरे कृष्ण आदी भजन गायिले. भजनांद्वारे आंदोलकांचा उत्साह वाढविला जात असल्याचे दिसून आले.

बैठकीत झाला निर्णय!

दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे हे फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर होते. पोलिसांनी आंदोलकांना समजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आंदोलनावर जनता ठाम दिसून आली. त्यामुळे नाशिक एमएमआरडीएचे अधिकारी उप कार्यकारी अभियंता वानखेडे, पिंपळनेरचे प्रभारी तहसीलदार प्रवीण चव्हाण आणि’ आम्ही पिंपळनेरकर’ आंदोलनकर्त्यां प्रतिनिधींची तातडीची एक बैठक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडली.

या बैठकीत येत्या दोन दिवसांत दीड किलोमीटरच्या पट्ट्याचे कॉक्रीटकरण करण्यात येणार असल्याचा विश्वास आंदोलनकर्त्यांना देण्यात आला. तेव्हा आंदोलनाची सांगता झाली.  महामार्ग रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे या महामार्गालगत अतिक्रमणाचा विळखा झाला आहे. लवकरच अतिक्रमणधारकांना पुन्हा नोटीस बजावण्यात येतील. तसेच इलेक्ट्रीक पोल आणि पाईपलाईनचे काम लक्षात घेवून रस्त्याचे क्रॉकीटीकरण होईल. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

काम सुरु न झाल्यास पुन्हा आंदोलन!
प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलनाची तलवार म्यान करण्यात आली आहे. मात्र,दोन दिवसांत काम सुरु न झाल्यास १५ दिवसांत पुन्हा बेमुदत आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

हेही वाचा :

The post Dhule : पिंपळनेर वासियांच्या ऐतिहासिक रास्तारोको'ला अखेर यश appeared first on पुढारी.