Dhule Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, दोघांना बेड्या

धुळे,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

साक्री येथील पेट्रोल पंपावर भल्या पहाटे दरोडा टाकण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता मात्र पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी झटापट करून चोरांचा हा  प्रयत्न हाणून पाडला आहे. या घटनेत पंपावरील चौघे जखमी झाले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि साक्री पोलिसांनी तातडीने हालचाली करून दोघा दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून घातक शस्त्र देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.

साक्री येथील सुशांत सर्व सेंटर पेट्रोल पंपावर आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास तिघा अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. या तिघांच्या हातात धारदार शस्त्र होते. त्यांनी पेट्रोल पंपाचा मॅनेजर सतीश उचाळे याला शस्त्राने धमकावून रोकड कुठे ठेवली असल्याची माहिती विचारली. मात्र पंपावरील उचाळे यांच्यासह युवराज मारनर, नाना मारणर आणि किरण नांद्रे यांनी दरोडेखोरांना न घाबरतात त्यांच्याशी झटापट सुरू केली. या झटापटीमध्ये धारदार शस्त्रामुळे चौघे जखमी झाले. मात्र त्यांनी एका दरोडेखोराला पकडले. या झटापटीनंतर दोघे चोरटे घटनास्थळावरून फरार झाले.

दरम्यान ही माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप महीराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील तसेच साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे हे पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यांनी आकाश थोरात याची चौकशी केली असता या दरोडाच्या प्रयत्नात इच्छापूर येथे राहणारे जितेंद्र कैलास वेंदे आणि योगेश मारनर हे देखील सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. त्यामुळे पोलीस पथकाने जितेंद्र वेंदे याला देखील ताब्यात घेतले. या दोघा चोरट्यांकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे योगेश मारणार याला ताब्यात घेण्यासाठी पथकाला रवाना करण्यात आले आहेत. दरम्यान या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तपास पथकाचे कौतुक केले असून त्यांना पाच हजार रुपयाचे पारितोषिक दिले आहे. तर आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांनी ई-पेमेंटचा वापर करून चोरीसारख्या घटनांना आळा घालावा असे आवाहन देखील बारकुंड यांनी यावेळी केले आहे.

हेही वाचा :

The post Dhule Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला, दोघांना बेड्या appeared first on पुढारी.