Dhule Crime : आरोपींना आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला परतुर येथून अटक

अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून 23 लाखांची रोकड लांबवणाऱ्या चौघा चोरट्यांना जालना जिल्ह्यातील परतुर येथे आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. धुळ्यात लूट करून (Dhule Crime)  ही चौघे चोरटे परतुर येथे सहा दिवस असल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली असून आता अटक केलेल्या आरोपीकडून अधिकची माहिती उघड होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

धुळे शहरातील (Dhule Crime)  माधव कॉलनी मध्ये घरी जाणाऱ्या परेशकुमार पटेल या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्याच्याकडून दुचाकी मध्ये ठेवलेले 23 लाखांची रोकड गाडीसह अज्ञात चौघा चोरट्यांनी लंपास केली. या गुन्ह्यामध्ये चोरट्यांनी शहरात मुख्य रस्ते आणि चौकांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दिसणार नाही, याची काळजी घेऊन पलायन केले. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या चोरट्यांचा माग काढत त्यांची ओळख पटवली. हा गुन्हा मोहाडी उपनगर परिसरात राहणारा जगपालसिंग अजयसिंग भादा व राजपालसिंग अजयसिंग भादा यांनी अन्य दोघां साथीदारांच्या मदतीने केल्याची बाब निदर्शनास आली. ही जबरी चोरी केल्यानंतर ये चौघे आरोपी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे गेल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक अहमदाबाद येथे दाखल झाले. मात्र तत्पूर्वीच या चोरट्यांनी तेथून पोबारा केला होता.

पोलीस पथकाने चौकशी केली असता सर्व आरोपी हे जालना जिल्ह्यातील परतुर येथे जसपालसिंग हरीसिंग जुनी याच्या घरी आश्रयाला असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील तसेच दिलीप खोंडे, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, अशोक पाटील, कुणाल पानपाटील, योगेश चव्हाण, राहुल सानप, उमेश पवार, पंकज खैरमोडे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी आदी पथकाने परतुर येथे सापळा लावला. मात्र या चौघा आरोपींनी तेथून देखील पलायन केल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पथकाने जसपालसिंग जुनी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच या चौघा आरोपींना पळवून लावल्याची बाब निदर्शनास आली. तसेच जुनी यानेच त्याच्या घरात या कुख्यात आरोपींना आश्रय दिल्याची बाब देखील तपासात पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला पुढील तपासासाठी आझाद नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Dhule Crime : आरोपींना आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला परतुर येथून अटक appeared first on पुढारी.