Site icon

Dhule Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून लूटणाऱ्या तिघांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील हरण्यामाळ तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या युवकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड तसेच दागिन्यांची लूट करणाऱ्या तीन जणांना अवघ्या 24 तासात तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने गजाआड केले आहे.

मुकटी येथे राहणारा अमोल दिनकर पाटील हा विद्यार्थी काल हरण्यामाळ तलाव परिसरात फिरण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला तीन युवकांनी तलाव परिसरात अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला धमकी देऊन त्याच्याकडील सोन्याची चेन तसेच रोकड काढून घेतली. यानंतर या तिघाही चोरट्यांनी पलायन केले. या प्रकारानंतर पाटील यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सुरू केला. (Dhule Crime)

तांत्रिक माहितीचे विश्लेषण करीत तसेच गुप्त माहितीच्या आधारावर हा प्रकार नगावबारी परिसरातील गुन्हेगारांनी केल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजश्री पाटील, तसेच राकेश मोरे, रवींद्र मोरे, अमोल कापसे, कुणाल शिंगाने, धीरज सांगळे, कांतीलाल शिरसाठ, प्रमोद पाटील, नितीन दिवसे आदी पथकाला या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानंतर विशाल वामन मालचे, अजय जोवळे, ज्ञानेश्वर गोसावी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता हा प्रकार त्यांनीच केल्याची बाब उघडकीस आली. दरम्यान पोलीस पथकाने विशाल मालचे कडून त्याने चोरी केलेले दागिने आणि रोकड असा 43 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा : 

The post Dhule Crime : विद्यार्थ्याला मारहाण करून लूटणाऱ्या तिघांना बेड्या appeared first on पुढारी.

Exit mobile version