Site icon

Dhule Crime : शेतकऱ्याकडून जिलेटिनचा साठा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिरपूर तालुक्यातील अनेर शिवारातील शेतकऱ्याकडून विहीर खोदकामासाठी वापरल्या जाणारा स्फोटकाचा साठा विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी शेखर यांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे. हा साठा नागपूर येथील स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीतून घेतल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे.

नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर यांना शिरपूर तालुक्यातील अनेर शिवारातील एका शेतकऱ्याकडे विहीर खोदकामासाठी वापरला जाणाऱ्या स्फोटकांचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने किसन भामरे यांच्या घरावर छापा मारला. यावेळी चाऱ्याच्या ढिगार्‍यातून जिलेटीनच्या 92 कांड्या आणि डीटोनेरचे तीन नग ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात भामरे यांच्यासह त्याला स्फोटके विकणाऱ्या योगेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान प्राथमिक तपासात भामरे यांनी हा साठा योगेश यांच्याकडून घेतल्याची माहिती दिली आहे. योगेश याचा विहीर खोदकाम करण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे विहिरीचे खोदकाम करण्यासाठी हा साठा घेतल्याचे भामरे यांचे म्हणणे आहे. मात्र योगेश याचे पूर्ण नाव त्याला माहीत नसून त्याचा पत्ता देखील माहीत नसल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता योगेश याला हुडकून काढण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान या प्रकरणात थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांनी तपास सुरू केला आहे. भामरे याला न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असून आता हा स्फोटकांचा साठा त्याने नेमका कुणाकडून घेतला. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

दरम्यान हा साठा भामरे यांनी दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानंतर तो गुजरात राज्यात मजुरीसाठी निघून गेला होता. मात्र तेथून आल्यानंतर त्याने चाऱ्याच्या मध्ये जिलेटिनच्या कांड्या पाहिल्या. या कांड्या खराब होत असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्याने त्याने परिसरातील एकाला ही माहिती दिली. यातून त्याच्याकडे स्फोटके असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यापर्यंत पोहोचली.

दरम्यान या कांड्या नागपूर येथे स्फोटके बनवणारे कंपनीतील असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही कंपनी परवाना असलेल्या विहीर खोदकाम करणाऱ्या व्यक्तींनाच जिलेटीनचा कांड्या नियमानुसार उपलब्ध करून देते. मात्र भामरे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना त्याच्याकडे एवढा मोठ्या प्रमाणात साठा आला कसा, या दिशेने सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

The post Dhule Crime : शेतकऱ्याकडून जिलेटिनचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Exit mobile version