Diwali Festival 2020 : भाऊबीज, पाडव्यानिमित्त बाजारात गर्दी; खरेदीदारांत उत्साहाचे वातावरण

नाशिक : भाऊबीज व दिवाळी पाडवा एकाच दिवशी आला असून त्यानिमित्त रविवारी (ता. 15) बाजारात उत्साही वातावरण होते. खरेदीदारांचा उत्साह तसूभरही कमी होत नसल्याने रस्त्यावरची गर्दी पाचव्या दिवशीही कायम होती.

कपड्याची दुकाने सजली

उद्या सोमवारी (ता.१६) भाऊबीजेच्या पार्श्‍वभूमीवर रेडिमेड कपडे, साड्या व अन्य दुकाने सजली असून खरेदीदारांचा उत्साहही टिकून आहे. यंदा कपडा घेऊन शिवून घेण्यापेक्षा अनेकांनी तयार कपड्यांना अधिक पसंती दिल्याने तयार कपडे घेण्याकडे अनेकांचा कल होता. कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक गणित यंदा कोलमडल्याने दुकानांऐवजी रस्त्यावरील खरेदीत ग्राहकांनी अधिक रस दाखविला. त्यामुळे मोठमोठ्या दुकानांत शुकशुकाट तर रस्त्यावरील खरेदीला ग्राहकांनी जास्त प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे शालिमार, मेनरोड याभागात दर दिवशी लाखो रूपयांची उलाढाल झाली.

फुलांची मागणी घटली

दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी झेंडूसह शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असते. यंदा परतीच्या पावसाने थैमान घातल्याने दस-यापासून सोन्याचे मूल्य लाभलेल्या झेंडूला दिवाळीतही मोठी मागणी होती. मात्र मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे सायंकाळपर्यंत झेंडूचे दर चढेच राहिले. त्यामुळे यादिवाळीत केवळ झेंडुमध्येच लाखो रूपयांची उलाढाल झाली. उद्या पाडवा व भाऊबीजेच्या धर्तीवर फुलांना विशेष मागणी नसल्याने काल चारशे रूपयांवर पोहोचलेले झेंडूचे क्रेट आज शंभर रूपयांवर आले.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

रेड्याच्या मिरवणुकांबाबत संभ्रम

शहरात दिवाळी पाडव्याला रेड्याला मिरवणुका काढण्याची प्राचीन परंपरा आहे. शहरात त्यातल्यात्यात पंचवटी भागात मोठ्या प्रमाणावर तबेले असून त्यांच्याकडून पाडव्याला रेड्यांना सजवून जवळच्या म्हसोबा मंदिरापर्यंत मिरवणुका काढल्या जातात. पंचवटीतील दिंडोरी रोडवरील म्हसोबा मंदिरासह पेठरोडवरील म्हसोबा मंदिरात यात्रोत्सवाचेही आयोजन केले जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अद्यापही या मिरवणुकांना परवानगी दिलेली नाही, त्यामुळे त्याबाबत संभ्रमावस्था आहे.

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल