Dog killing : श्वान हत्यांविरोधात नाशिकमध्ये प्राणिप्रेमी एकवटले

प्राणीप्रेमी श्वान हत्येविरोधात एकवटले,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केरळ राज्यात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचे हत्यासत्र (Dog killing)  सुरू असून, या हत्याकांडाच्या निषेधार्थ नाशिक ॲनिमल लव्हर्स क्लबच्या नेतृत्वाखाली प्राणिप्रेमी एकवटले आहेत. दर रविवारी शहरातील वेगवेगळ्या सिग्नलवर क्लबच्या सदस्यांसह प्राणिप्रेमींकडून मानवी साखळीद्वारे श्वान हत्याकांडाविरोधात निदर्शने करण्यात येत आहे. शासनाकडून दखल घेईपर्यंत निषेधाची मोहीम सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाने पंधरा वर्षांपूर्वी शहरांमधील भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्राणी जन्मदर नियंत्रण नियम जाहीर केलेले आहे. सर्व महापालिकांना त्याची अंमलबजावणी बंधनकारक केली आहे. श्वानांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी, त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी शस्त्रक्रियेद्वारे नसबंदी करणे हा एकमेव पर्याय कायद्याने मान्य करण्यात आला आहे. मात्र, केरळ शासनाने श्वान मारण्याचे (Dog killing)  आदेश काढल्याने सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. नसबंदीतून हा प्रश्न सोडविण्याची मागणी प्राणिप्रेमींनी केली आहे.

जुना गंगापूर नाका सिग्नल येथे श्वानहत्येबद्दल (Dog killing)  निषेध करण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. यावेळी जगबीर सिंग, डॉ. वर्षा चेट्टीवार, कीर्ती गायकवाड, कुलदीप कौर, गौरव क्षत्रिय, साक्षी घुगे आदी सहभागी झाले हाेते. दरम्यान, केरळमधील श्वानहत्यांमुळे प्राणिप्रेमी व कार्यकर्ते एकत्र आले आहेत. पाच वर्षांपूर्वीही केरळमध्ये असाच भटक्या श्वानांचा संहार करण्यात आला होता. मात्र, हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. लसीकरण व नसबंदीतून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन कीर्ती गायकवाड यांनी केले.

हेही वाचा :

The post Dog killing : श्वान हत्यांविरोधात नाशिकमध्ये प्राणिप्रेमी एकवटले appeared first on पुढारी.