Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी

विनायक पांडे चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील (पानपाटील) याच्याशी कनेक्शन असल्याच्या संशयातून शिवसेनेचे माजी महापौर तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक पांडे यांची नाशिक शहर गुन्हे शाखेकडून तब्बल अर्धा तास चौकशी करण्यात आली. पांडे यांचा वाहनचालक अर्जुन परदेशी हा नंतर ललित पाटीलकडे वाहनचालक म्हणून होता. याच कारणातून पांडे यांची चौकशी झाली असून, परदेशीबाबतच काही प्रश्न विचारल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले.

ड्रग्ज माफिया ललित पाटील हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने शिवसेनेच्या नेत्यांशी त्याचा संबंध असल्याचा संशय सुरुवातीपासूनच व्यक्त होत आहे. तसेच ललितच्या ड्रग्ज व्यवसायाला काही राजकारण्यांचे पाठबळ असल्याचे संकेत सुरुवातीपासूनच मिळत असल्याने राजकारण्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांचा वाहनचालक अर्जुन परदेशी हा नंतर ललित पाटीलचा वाहनचालक असल्याने या प्रकरणात विनायक पांडे यांचे नाव समोर आल्याने शहर गुन्हे शाखेने गुरुवारी (दि. २६) त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यानुसार पांडे शुक्रवारी (दि. २७) दुपारी 2 वाजता शहर गुन्हे शाखा येथे चौकशीसाठी हजर झाले होते.

पोलिसांनी अर्धा तास त्यांची चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना पांडे यांनी वाहनचालक अर्जुन परदेशीवरून प्रश्न विचारल्याचे सांगितले. परदेशी माझ्याकडे 10 ते 12 वर्षे वाहनचालक म्हणून काम करीत होता. मात्र त्याला मधुमेहाचा त्रास झाल्याने त्याला रात्रीच्या वेळी गाडी चालविताना धुरकट दिसायचे. त्यामुळे तो मला सायंकाळी ७ वाजता सुटी द्यावी, असे सांगत होता. तेव्हा मी त्याला कायमची सुटी घे असे सांगून कामावरून काढून टाकले. माझ्याकडे कामावर असताना सकाळी ९ ते दुपारी २ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत त्याची ड्यूूटी होती. मधल्या सुटीच्या काळात आणि रात्री १० नंतर तो काय करायचा, हे आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी चौकशीत सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेमुळे ललित पाटीलला ओळखत असलो, तरी त्याच्याशी कधी थेट संबंध आला नसल्याचेही पांडे म्हणाले. दरम्यान, चौकशीसाठी पांडेे कार्यकर्त्यांसोबत हजर झाले होते.

तत्कालीन शहराध्यक्षांवर बोट

ललित पाटीलच्या शिवसेना प्रवेशाचे शिवसेना भवन येथील छायाचित्र सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. या छायाचित्रामध्ये विनायक पांडे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, माजी मंत्री बबन घोलप, गोडसे, अजय बोरस्ते, अजय चौधरी, लवटे आदी दिसत आहेत. या प्रवेशासाठी विनायक पांडे आग्रही असल्याचा आरोप होत आहे. मात्र, पांडे यांनी ते आरोप फेटाळून लावत तत्कालीन शहराध्यक्षांकडे बोट दाखविले आहे. शहराध्यक्षांनीच उद्धव ठाकरे यांची वेळ घेऊन ललित पाटीलला शिवसेनेत प्रवेश दिल्याचा पलटवार त्यांनी केला.

इतरही राजकारणी रडारवर

एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून केला जात आहे. सामनगाव, वडाळा गाव आणि शिंदेगाव या तीन गुन्ह्यांमध्ये एमडीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी संशयित हे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यासाठी काही पथके परजिल्ह्यातही रवाना झाली आहेत. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीपासूनच राजकारण्यांची नावे पुढे येत असल्याने, इतरही काही स्थानिक बड्या नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.

हेही वाचा :

The post Drug Case : विनायक पांडे यांची पोलिसांकडून अर्धा तास चौकशी appeared first on पुढारी.