Eknath Shinde : मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? मालेगावकरांना उत्सुकता

मुख्यमंत्री मालेगावात

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सत्ताधारी गटाचे लक्ष आणि जनतेत कमालीची उत्सुकता असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नियोजित मालेगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.  सत्तांतर नाट्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती अन् त्यातून गुरुबंधू ज्येष्ठ आमदार दादा भुसे यांचा वाढलेला दबदबा, यातून प्रथमच नाशिक विभागाची आढावा बैठक मालेगाव शहरात होत आहे. परिणामी, या दौर्‍याला कमालीचे महत्त्व आले असून, शक्तिप्रदर्शन आणि नियोजनाबाबत त्रुटी राहणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

काल मध्यरात्री मालेगावात ते दाखल झाले आहेत. आज सकाळी 10 वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुलामध्ये विभागीय पर्जन्यवृष्टी, नुकसान आणि पाणी आदी योजनांचा आढावा घेतील. त्यानंतर नूतन पोलिस वसाहतीचे लोकार्पण, बोरी – अंबेदरी व दहिकुटे कालवा बंदिस्तीकरण, कृषी विज्ञान संकुल आणि जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी योजनांचे ऑनलाइन भूमिपूजन होणार आहे. दुपारी 12 वाजता पोलिस कवायत मैदानावर जाहीर सभा आणि नागरी सत्कार सोहळ्याचे नियोजन आहे. त्यानंतर मनमाडमार्गे संभाजीनगरमधील ‘मुख्यमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे रवाना होतील.

या बैठक आणि कार्यक्रमांच्या संपूर्ण नियोजनाची सूत्रे ज्येष्ठ आमदार भुसे यांच्या हाती आहेत. विभागीय बैठकीचे ठिकाण असलेले क्रीडा संकुल आणि सभास्थळी पावसाचा अंंदाज घेत डोम उभा करण्यात आला आहे. कोणत्याही ठिकाणी बकालपणा दिसणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मुख्य मार्गाचे रूपडे पालटले आहे. रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. नाशिकप्रमाणे मालेगावात पंचतारांकित सुविधा नसल्याने मुख्यमंत्री हे शासकीय विश्रामगृहातच मुक्काम करतील. त्यामुळे सामान्य रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर प्रथमच या रेस्ट हाऊसला झळाळी आली आहे.

जिल्हानिर्मितीसह शहर व तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री काय घोषणा करतात, याविषयी मालेगावकरांना उत्सुकता आहे. तर, नुकतीच दिल्लीवारी झाली असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराविषयी या सभेत काय संकेत मिळतात, याकडे राज्याचे लक्ष असेल.

भाजपचा मेळावा रद्द
शनिवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित असताना, भाजपचाही निर्धार मेळावा जाहीर झाला होता. परंतु, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. सोयगावमधील रेणुका लॉन्समध्ये हा मेळावा होणार होता.

काही कार्यकर्त्यांना नोटिसा
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेत दोन प्रवाह निर्माण झालेत. त्यात ठाकरे – शिंदे असा सरळ फरक केला जात आहे. येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे आमदार भुसे यांच्या पाठीशी खंबीर असल्याने नाशिकच्या तुलनेत मालेगाव विभागीय बैठकीसाठी योग्य ठरल्याचा सूर उमटत आहे. या सोहळ्याला कुणी राजकीय हेव्यादाव्यातून गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी काही ठराविक विचारसरणीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत.

The post Eknath Shinde : मुख्यमंत्री आज काय घोषणा करणार? मालेगावकरांना उत्सुकता appeared first on पुढारी.