Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंना अयोध्यावारीचे वेध

एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याने या दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्याचे काम नाशिकमधील पदाधिकाऱ्यांकडे येऊ शकते. कारण याआधी उद्धव ठाकरे यांच्या दाैऱ्यापूर्वी शिवसेनेच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनीच खासदार संजय राऊत यांच्याबरोबर जाऊन नियोजन केले होते.

अयोध्यात शरयू नदीवरील महाआरतीचे प्रमुख महंत शशिकांतदास महाराज, महंत छबिरामदास महाराज, महंत शत्रुघनदास महाराज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व अयोध्या यांचे अतूट नाते आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, याचा आम्हा सर्वांनाच आनंद आहे, अशी भावना महंत शशिकांतदास महाराजांनी व्यक्त केली. हिंदुत्वाच्या मार्गाने पुढे जाणारे एकनाथ शिंदे यांना आम्ही खास निमंत्रण देण्यास आलेलो आहे. अयोध्येत येऊन रामल्लाचे दर्शन घ्यावे व शरयू नदीची महाआरती करावी, अशी इच्छा महंतांनी व्यक्त केली.

शिंदे यांनी महंत शशिकांतदास महाराज यांच्या विनंतीला मान देऊन आमंत्रण स्वीकारले असून, लवकरच अयोध्येला येणार असल्याची ग्वाही दिली. यामुळे आता शिंदे यांच्या मेळाव्याचे नियाेजन नाशिकसह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या दाैऱ्याचा अनुभव घेणारे काही पदाधिकारी शिंदे गटात असल्याने या दौऱ्याच्या नियोजनाकडे लक्ष लागून आहे.

अयोध्या भेटीच्या निमंत्रणावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार राहुल शेवाळे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.\

हेही वाचा :

The post Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंना अयोध्यावारीचे वेध appeared first on पुढारी.