Site icon

Environmental protection : चला करू या संकलन बियांचे…

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक नरेंद्र सोनवणे यांनी नुकतेच संकलन केलेल्या बियांचे प्रदर्शन शाळेत भरविण्यात आलेे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जनार्दन गतीर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावच्या ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षक सोनवणे हे आपल्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या मदतीने ‘चला करूया संकलन बियांचे’ हा पर्यावरणपूरक उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहे. बियासंकलन उपक्रमाअंतर्गत विविध प्रजातींच्या बिया विद्यार्थ्यांनी गोळा केल्या आहेत. जैवविविधतेचे महत्त्व स्थानिक गावकरी व मुलांच्या मनावर बिंबवले तर त्याचे चांगले परिणाम भविष्यात बघायला मिळतील, असे मत मुख्याध्यापक भगवंत पाटील यांनी व्यक्त केले. संकरित बियाणे व पारंपरिक, गावरान बियाणे यातील फरक व गावरान बियाणांचे आरोग्याच्या द़ृष्टीने महत्त्व शिक्षक अनिल बागूल यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले. शिक्षक रेखा शेवाळे, सरला बच्छाव, मालती धामणे, सुनंदा कंखर, ज्योती ठाकरे, विमल कुमावत, हेमलता शेळके, भगवान देशमुख, राजकुमार रमणे आदी शिक्षकांनी बिया संकलनास मेहनत घेतली.

असा आहे उद्देश…
बियांचे संकलन करून त्याद्वारे विविध प्रकारच्या फळा फुलांच्या बियांची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे, प्रत्यक्ष बिया विद्यार्थ्यांना हाताळता येणे, शाळेची रोपवाटिका तयार करणे, सीडबॉलच्या माध्यमातून गावाच्या अवतीभोवती विविध फळांच्या झाडांची लागवड करणे, त्याचप्रमाणे आरोग्यास उपयुक्त ठरणार्‍या औषधी बियांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे, संकरित बियाणे व पारंपरिक, गावरान बियाणे यांचे फायदे-तोटे विद्यार्थ्यांना समजून सांगणेे, हा या बिया संकलनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

275 बिया विद्यार्थ्यांनी केल्या संकलित : विद्यार्थ्यांनी स्वतः फिरून आंबा, अशोका, गुलमोहर, कांचन, साग, रामफळ, सीताफळ,आवळा, कोकम, शिरीष, जांभूळ, अभय, पिंपळ, आपटा, पेरू, कडुलिंब, करंज, जायफळ, सुपारी, एरंड, पपई, चिंच, चिकू, बोर, काशीद, शेवगा, गोरखचिंच अशा सुमारे 275 पेक्षा जास्त बिया संकलित केल्या आहेत. बिया संकलन करण्याचा त्यांना छंदच जडला आहे. त्यातून त्यांना पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा:

The post Environmental protection : चला करू या संकलन बियांचे... appeared first on पुढारी.

Exit mobile version