Girish Mahajan : काहीही झाले तरी उद्धव यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते

गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी शिवसेनाप्रमुखांवर तसेच शिवसेनेने छगन भुजबळ यांच्यावर टोकाची टीका केली. मात्र आता मुख्यमंत्री पदावरून गमतीजमती पहावयास मिळत असल्याची टीका राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

धुळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडी संदर्भातील बैठकीसाठी त्यांचे आगमन झाले होते. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कुणीही असते तरीही मुख्यमंत्रीपद त्यांनाच पाहिजे होते. राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांबद्दल टोकाची टीका केली. तर शिवसेनेने देखील त्यांच्यावर टीका केली .मी गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेसोबत होतो. त्यामुळे मी ही टीका पाहिली आहे. आता ते मुख्यमंत्री पदावरून एकमेकाला गुदगुल्या करण्याचे काम करीत असून या गमतीजमती असल्याचा टोला त्यांनी लावला आहे.

निवडणूक आयोगाकडे शिवसेनेने केलेल्या टीकेचा देखील त्यांनी समाचार घेतलेला आहे. त्यांच्याच मागणीनुसार निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह दिले आहे. पण न्यायालय तसेच आयोगाने बाजूने निर्णय दिल्यास तो योग्य आणि विरोधात निर्णय दिल्यास त्यावर टीका करण्याची आता पद्धतच झाली आहे. सध्याच्या स्थितीत बहुसंख्य आमदार, शिवसैनिक हे एकाच बाजूने आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे एक तृतीयांश देखील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी राहिलेले नाहीत. आमदार ,खासदार, शिवसैनिक हे त्यांच्या बाजूने नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करणे ही त्यांची फॅशनच असल्याचे मत देखील मंत्री महाजन यांनी नोंदवले आहे.

The post Girish Mahajan : काहीही झाले तरी उद्धव यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते appeared first on पुढारी.